6.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप : 150 हून अधिक जखमी, अनेक घरे, इमारती उद्ध्वस्त
वृत्तसंस्था/ सेबू
फिलिपिन्सच्या सेबू प्रांतात मंगळवारी रात्री 6.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या नैसर्गिक आपत्तीमध्ये 69 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 150 जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अनेक लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. मंगळवारी रात्रीपासून बचाव पथके बचाव कार्यरत असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने सुरुवातीला भूकंपाची तीव्रता 7.0 रिश्टर स्केल असल्याचे सांगितले होते, परंतु नंतर ते 6.9 रिश्टर स्केल इतकीच जाहीर केली.
भूकंपाचे केंद्र 90,000 लोकसंख्या असलेल्या सेबू बेटावरील बोगो शहराजवळ होते. पहिल्या भूकंपानंतर परिसरात 5 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे आणखी चार धक्के जाणवले. या हादऱ्यांमुळे लोक घराबाहेर पळाले. या भूकंपासंबंधीची अनेक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाली असून त्यामध्ये जमीन, वाहने, घरे आणि लोक हेलकावे खाताना दिसत आहेत. या आपत्तीमध्ये अनेक घरे, इमारती, चर्च आणि अन्य मालमत्तांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
फिलिपिन्स रिंग ऑफ फायरजवळ असल्यामुळे येथे भूकंप होणे सामान्य आहे. रिंग ऑफ फायर हा असा प्रदेश आहे जिथे अनेक खंडीय आणि महासागरीय टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स एकमेकांवर आदळल्यामुळे भूकंप होतात. तसेच सुनामी आणि ज्वालामुखींचा उद्रेक असे प्रकारही घडतात. जगातील 90 टक्के भूकंप या रिंग ऑफ फायर प्रदेशात होतात. हा प्रदेश 40,000 किलोमीटर पसरलेला आहे. जगातील 75 टक्के सक्रिय ज्वालामुखी या प्रदेशात आहेत. जपान, रशिया, फिलिपिन्स, इंडोनेशिया, न्यूझीलंड, अंटार्क्टिका, कॅनडा, अमेरिका, मेक्सिको, ग्वाटेमाला, कोस्टा रिका, पेरू, इक्वेडोर, चिली आणि बोलिव्हिया हे रिंग ऑफ फायरजवळ असलेले देश आहेत.









