फॉर्च्यून इंडियाच्या अहवालात माहिती
नवी दिल्ली
सध्याला जागतिक स्तरावर आर्थिक संकट असण्यासोबत वाढती महागाई आणि महागड्या व्याजदराचा सामना इतर देशांना करावा लागत आहे. मात्र भारताची आर्थिक स्थिती उत्तम असून याचदरम्यान भारतीय उद्योगपतींच्या संपत्तीत 133 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती पुढे आली आहे. फॉर्च्यून इंडियाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. जगात फक्त भारतातच इतकी मजबूत आर्थिक वाढ आहे. देशातील 157 सर्वात श्रीमंत उद्योगपतींची सध्याची निव्वळ संपत्ती 69.30 लाख कोटी रुपये आहे.
मुकेश अंबानींकडे 8.19 लाख कोटी रुपयांची संपत्ती
या यादीत पहिल्या क्रमांकावर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आहेत. त्यांची संपत्ती 8.19 लाख कोटी रुपये आहे, जी 2022 च्या तुलनेत 9 टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी त्यांची संपत्ती 7.54 लाख कोटी रुपये होती. एका वर्षात सुमारे 65 हजार कोटींची संपत्तीत वाढ झाली आहे. तथापि, मालमत्ता वाढीच्या बाबतीत, सिम्पसन अँड कंपनीचे के ए कृष्णमूर्ती आणि जिरोधा ब्रोकिंगचे निखिल कामत हे आघाडीवर आहेत, त्यांची मालमत्ता एका वर्षात दुप्पट झाली आहे.
बैजू रवींद्रन यांची संपत्ती 73.16 टक्क्यांने घटून 10,980 कोटी झाली. त्याचवेळी, अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीत एका वर्षात 49.17 टक्के घट झाली आहे.









