नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमधील विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतर आता भाजपने त्रिपुरा आणि मेघालय या ईशान्य भारतातील छोटय़ा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे लक्ष देण्यास प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. आज 18 डिसेंबरला पंतप्रधान मोदी या दोन राज्यांचा दौरा करणार असून तेथे ते एकंदर 6,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत.
या प्रकल्पांमध्ये गृहनिर्माण, मार्गनिर्माण, कृषी, जलसिंचन, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन आणि आदरातिथ्य व्यवसायांशी संबंधित उपक्रमांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी ईशान्य भारत मंडळाच्या 50 व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार असून त्यासाठी ते मेघालयची राजधानी शिलाँगला जाणार आहेत.
त्रिपुरावर विशेष लक्ष
त्रिपुरामध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप डाव्या आघाडीचा पराभव करुन सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरला होता. या राज्याची राजधानी आगरतळा येथे त्यांच्या हस्ते गृहनिर्माण प्रकल्पाच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांचे वितरण केले जाणार आहे. या योजनेचा लाभ दोन लाख कुटुंबांना होणार आहे. त्रिपुरासाठी केंद्र सरकारने 4,350 कोटी रुपयांचे विविध प्रकल्प प्रदान केलेले असून त्यांचा प्रारंभ पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. हा प्रारंभ जाहीर कार्यक्रमात होईल.
अन्य विविध प्रकल्प
प्रत्येक गरीब कुटुंबाला त्याचे स्वतःचे घर असावे, अशी केंद्र सरकारची महत्वाकांक्षा असून त्यासाठी केंद्र सरकारने देशव्यापी गृहनिर्माण प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत विविध राज्यांमध्ये आतापर्यंत दोन कोटींहून अधिक घरांची निर्मिती करण्यात आली आहे. ईशान्य भारताकडे या प्रकल्पांतर्गत विशेष लक्ष पुरविण्यात आलेले असून त्यामुळे या भागाचा विकास झाला आहे.









