आरोप झालेल्या दोन अभियंत्यांची पदोन्नती रोखली
मुंबई / प्रतिनिधी
मुंबई महापालिकेत आतापर्यंत ग्रीस घोटाळा, कचरा घोटाळा, नालेसफाई घोटाळा, रस्ते कामात घोटाळा, भूखंड घोटाळा असे काही घोटाळे गाजले आहेत. आता मुंबई महापालिकेच्या दोन अभियंत्यांनी तब्बल 680 कोटी रुपयांचा पाणी घोटाळा केल्याचा गंभीर व खळबळजनक आरोप सत्ताधारी शिवसेनेचे नेते व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मंगळवारी पालिका सभागफहात केला.
विशेष म्हणजे ज्या दोन अभियंत्यांवर पाणी घोटाळय़ाचा आरोप झाला आहे, त्यांना पदोन्नती देण्याबाबतचा प्रस्ताव पालिका प्रशासनानेच मंजुरीसाठी सभागफहात आणला होता. मात्र, यशवंत जाधव यांनी उपसूचना मांडत या अभियंत्यांवर बेकायदेशीरपणे लाखो लिटर पाण्याची विक्री केल्याचा आरोप करीत याप्रकरणी प्रशासनाकडून खुलासा येईपर्यंत पदोन्नती रोखण्याची मागणी केली. त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी, दोन अधिकाऱयांवरील आरोप हे गंभीर असून याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तसेच प्रशासनाने पदोन्नतीबाबतच्या प्रस्तावात संबंधित अधिकाऱयांची चौकशी न करता प्रस्ताव मंजुरीला आणणे चुकीचे असून यापुढे चौकशी करूनच प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश देत नाराजी व्यक्त केली.
पदोन्नतीचा प्रस्ताव आला आणि पाणी घोटाळा उघडकीस झाला
पालिकेने संजय जाधव, अरुण भोईर, विवेक मोरे व ज्यांच्यावर आरोप झाले ते बाबासाहेब साळवे आणि अजय राठोर या पाच उपप्रमुख अभियंत्यांना ‘प्रमुख अभियंता’ या पदावर पदोन्नती देण्याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी पालिका सभागफहात मंजुरीसाठी प्रशासनाने सादर केला होता. त्यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आक्षेप घेत उपसूचना मांडली. या पाच उपप्रमुख अभियंत्यांपैकी अजय राठोर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून उपअभियंता यांची सही घेऊन बेकायदेशीरपणे लाखो लिटर पाण्याची विक्री केली असल्याचा गंभीर आरोप केला. पालिका व्यावसायिक दरात म्हणजे एक हजार लिटर पाणी 40 रुपयांत विकत असताना या अभियंत्यांनी मात्र 1 हजार लिटर पाणी 450 रुपये दरात विकले, असा आरोप जाधव यांनी केला.
शिवडी ते डॉकयार्ड रोड परिसरातील सहा बंदरांमध्ये लागणाऱया बोटी धुण्यासाठी मागील 17 वर्षांपासून दररोज तब्बल दहा लाख लिटर पाणी बेकायदेशीररित्या पालिकेचे उपप्रमुख अभियंते अजय राठोर व बाबासाहेब साळवे या दोन अभियंत्यांनी विकले. याबाबत अधिक माहिती देताना यशवंत जाधव म्हणाले की, मुंबई पोर्ट ट्रस्ट कोळसा बंदर, रेती बंदर, लाकडी बंदर आदी विभागात पाण्याची लाईन देण्यासाठी पालिकेकडे मागणी करण्यात आली असता, या ठिकाणी आधीच एक लाईन देण्यात आल्याचे उघड झाले. या लाईनमधून दिवसाला 3 लाख 60 हजार लिटर पाणी दिले जात होते. पालिका एक हजार लिटर पाण्यासाठी 40 रुपये दर लावते. मात्र रेवस, उरण आणि इतर ठिकाणाहून आलेल्या बोटींना 450 रुपयात एक हजार लिटर पाणी विकले जात होते. गेले 17 वर्ष हा प्रकार सुरू होता. यामधून सुमारे 680 कोटींचा घोटाळा झाला आहे. याठिकाणी आणखी एकाने पाण्याची लाईन मागितली. त्यालाही पालिका दिवसाला 3 लाख लिटर पाणी देणार होते. दोघांना तब्बल 6 लाख 50 हजार लिटर पाणी दिले जाणार होते. मात्र, याबाबतची माहिती मिळताच यशवंत जाधव यांनी त्या दोन अभियंत्यांची पदोन्नती रोखून धरली.
यावेळी भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी, ज्या अधिकाऱयांनी बेकायदा पाणी विक्री करून पालिकेची फसवणूक केली त्या अधिकाऱयांना पदोन्नती न देता त्यांना निलंबित करावे, अशी मागणी केली. तर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी, या पाणीचोरीमुळे पालिकेचा 680 कोटींचा महसूल बुडाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या दोन उपप्रमुख अभियंत्यांबाबत आयुक्तांनी खुलासा करावा, अशी मागणी केली.









