वृत्तसंस्था / कैरो
येमेनच्या किनाऱ्याजवळ एका बोटीला अपघात होऊन 68 आफ्रिकन स्थलांतरितांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील 74 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. तथापि, त्यांच्या वाचण्याची आशा फार कमी आहे. या अपघातातून फक्त 12 स्थलांतरित बचावले. ही दुर्घटना येमेनच्या किनाऱ्यावरील बोटी बुडण्याच्या मालिकेतील नवीनतम घटना आहे. बेपत्ता स्थलांतरितांच्या मोठ्या संख्येमुळे शोध आणि बचाव मोहीम तीव्रपणे सुरू करण्यात आली आहे.
येमेनमधील आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेचे प्रमुख अब्दुसत्तोर असोव यांनी सोमवारी या घटनेसंबंधी माहिती दिली. रविवारी पहाटे दक्षिण येमेनी प्रांत अब्यानजवळील एडेनच्या आखातात 154 इथिओपियन स्थलांतरितांनी भरलेली बोट बुडाल्याचे त्यांनी सांगितले. बचाव पथकाकडून खानफर जिह्यात 54 स्थलांतरितांचे मृतदेह किनाऱ्यावर आणण्यात आले. तसेच 14 जण मृतावस्थेत आढळले. येथे अरब देशांमध्ये पोहोचण्याच्या आशेने संघर्ष आणि गरिबीतून पळून जाताना शेकडो आफ्रिकन स्थलांतरितांचा अशा अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे.









