नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने आमदारांच्या वेतनात तब्बल 66 टक्के इतकी घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या आमदारांना आता प्रतिमहिना 54 हजार ऐवजी 90 हजार रुपये वेतन मिळणार आहे. याशिवाय भत्ते इत्यादी जमेस धरुन आमदारांचे मासिक उत्पन्न 1 लाख 70 हजार रुपयांपर्यंत जाणार आहे. या निर्णयाची अधिसूचना दिल्ली सरकारने सोमवारी काढली.
गेल्या 7 जुलैला दिल्ली विधानसभेत वेतन, निवृत्तीवेतन आणि भत्ते वाढविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव, विरोधी पक्षनेते आणि विधानसभा अध्यक्ष यांचे वेतन, निवृत्तीवेतन आणि भत्ते वाढविण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला होता. तो त्वरित संमत करण्यात आला. त्यानंतर 14 फेब्रुवारीला राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली होती.
12 वर्षांनी वाढले वेतन
दिल्लीत आमदारांच्या वेतनात तब्बल 12 वर्षांमध्ये प्रथमच ही वाढ करण्यात आली आहे. आमदारांचे मूळ वेतन 20 हजार रुपयांवरुन 30 हजार रुपये करण्यात आले आहे. तर दैनिक भत्ता 1 हजार रुपयांवरुन 1 हजार 500 रुपये करण्यात आला. महागाई व खर्च वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.









