वृत्तसंस्था / रांची
भारतीय जनता पक्षाने झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 66 उमेदवारांची सूची प्रसिद्ध केली आहे. या सूचीअनुसार पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबुलाल मरांडी यांना धनबाद मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर जमतारा मतदारसंघातून सीता सोरेन यांना तिकीट देण्यात आले आहे. काही आठवड्यांपूर्वी भारतीय जनता पक्षात आलेले झारखंड मुक्ती मोर्चा नेते चंपाई सोरेन यांनाही सरायगेला येथे उमेदवारी देण्यात आली आहे, अशी माहिती पक्षसूत्रांनी दिली आहे.
गीता कोडा यांना जगन्नाथपूर मतदारसंघातून उतरविण्यात आले आहे. काही नवे चेहरेही देण्यात आले आहेत. उमेदवार निवडताना जातीचे समीकरण सांभाळण्यात आले आहे, अशीही महिती देण्यात आली आहे. झारखंडमध्ये 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होत असून 23 नोव्हेंबरला मतगणना करण्यात येणार आहे. लवकरच या राज्यात प्रचार शिगेला पोहचणार असून संबंधित पक्षांचे प्रमुख नेते त्यात सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांची आघाडी या दोन्ही आघाड्यांसाठी ही निवडणूक महत्वाची आहे. दोन्ही आघाड्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या राज्यात काही सभा घेणार आहेत.









