पन्हाळा – पावनखिंड पदभ्रमंती : अध्यक्ष प्रमोद पाटील यांची माहिती
कोल्हापूर प्रतिनिधी
हिल रायडर्स फाउंडेशन मार्फत गेली 39 वर्ष सातत्याने पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक मार्गावरून मोहिमेचे आयोजन करण्यात येते.यंदाची ही मोहीम 65 वी मोहीम आहे. आज शनिवारी आणि उद्या रविवारी (दि. 1 व 2 जुलै) सकाळी आठ वाजता ऐतिहासिक पन्हाळा गडावरील नरवीर बाजीप्रभू पुतळा येथून मान्यवरांच्या हस्ते पूजन करून या मोहिमेस सुरुवात होणार आहे. ही माहिती हिल रायडर्सचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी दिली. या मोहिमेत संपूर्ण महाराष्ट्रातून आतापर्यंत साडेतीनशे युवक युतीने नोंदणी केली असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
स्वराज्य रक्षणार्थ प्राणाची आहुती देणाऱ्या नरवीर स्वामीनिष्ठ वीर शिवा काशिद, नरवीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, बांदल सेना व ज्ञात अज्ञात शूरवीर मावळ्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आणि इथे घडलेला इतिहास अनुभवण्यासाठी शिवभक्त निसर्गप्रेमी गिर्यारोही मंडळी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होतात.
या मार्गावर घडलेला इतिहास अनुभवण्याची ही मोहीम आहे. त्याचबरोबर या ऐतिहासिक मार्गावर प्रदूषण होऊ नये हा मार्ग प्रदूषणमुक्त राहाव। प्लास्टिक मुक्त राहावा यासाठी, शिवकार्याचा ठसा, पर्यावरण रक्षणाचा वारसा. हे ब्रीदवाक्य मनी ठेवून या मोहिमेस कोल्हापूर जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सहभागींना प्रदूषणमुक्त पर्यावरणाबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यंदा हील रायडर्स तर्फे तीन मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी पहिली मोहीम एक जुलै रोजी सकाळी आठ वाजता पन्हाळगडावरील नरवीर बाजीप्रभू पुतळा येथून पुतळ्याचे पूजन करून सुरुवात होणार आहे.यावेळी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असेही प्रमोद पाटील यांनी सांगितले.