कदंबसाठी मिळणार 250 इलेक्ट्रिक बसेस : शंभर बसगाड्या मिळणार महिना अखेरीस योजनेमुळे सर्व बसगाड्या मिळणार मोफत ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून गोव्याला भेट,वाहतूकमंत्री गुदिन्हो यांच्या प्रयत्नांना घवघवीत यश

पणजी : दाबोळी विमानतळ ते वेर्णा जंक्शनपर्यंतच्या फ्लाय ओव्हरला केंद्रीय भूपृष्ट वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे. सुमारे 650 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी लवकरचा निविदाही जारी केल्या जाणार आहेत. तसेच कदंबसाठी आणखी 250 इलेक्ट्रिक बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. याशिवाय राज्यातील 16 बसस्थानकांचे बसपोर्टमध्ये रुपांतर केले जाईल. या सर्व प्रकल्पांचा खर्च केंद्र सरकार करणार असून बसपोर्टचाही खर्च केंद्र सरकारतर्फे उचलण्याची तयारी मंत्री गडकरी यांनी दर्शविली आहे. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी काल बुधवारी नवी दिल्लीत गडकरी यांची भेट घेतली असता त्यांनी गोव्यासाठी वरील प्रकल्पांना मान्यता जाहीर केली. गडकरी यांच्या निमंत्रणावरुन गोव्याचे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो हे नवी दिल्लीला गेले होते. नवी दिल्लीतील बैठकीनंतर ‘तरुण भारत’शी बोलताना मंत्री गुदिन्हो यांनी आपली भेट व बैठक यशस्वी झाल्याचे सांगितले.
कदंबला लवकरच 250 इलेक्ट्रिक बसेस
गोवा सरकारतर्फे कदंबसाठी 500 इलेक्ट्रिक बसेसची मागणी आपण केली होती. त्यातील 250 बसेस एप्रिल अखेरीस गोवा सरकारला मिळू शकतील. सध्या जी इलेक्ट्रिक बसेसकरीता योजना आहे, त्यात आपण सुधारणा करीत आहे. लवकरच ही नवी योजना तयार होईल. त्यानंतर गोवा सरकारला 250 बसेस मोफत मिळतील, असे गडकरी यांनी सांगितले, असे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.
महिन्या अखेरीस मिळणार शंभर बसेस
केंद्राने गोव्याला यापूर्वीच 50 बसेस पाठविल्या आहेत. आता या महिन्याच्या अखेरीस आणखी 100 इलेक्ट्रिक बसेस मिळणार आहेत. प्रत्येक बसची किंमत रु. 2 कोटी आहे. केंद्र सरकार आम्हाला प्रत्येक बसमागे रु. 45 लाखांची सबसिडी देणार आहे. त्यामुळे गोव्याला ही बस रु. 1 कोटी 55 लाखांना पडणार आहे. 1 एप्रिलपासून सर्व 100 इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावरुन धावू लागतील.
योजनेमुळे सर्व बसेस मोफत मिळू शकतात
याशिवाय आणखी 250 बसेस एप्रिल अखेरपासून येण्यास प्रारंभ होईल. मात्र बसेस करीता आम्हाला काही खर्च येणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जी योजना तयार केली आहे. त्यातून आम्हाला या बसेस मोफत मिळू शकतात, असे मंत्री गुदिन्हो म्हणाले.
दाबोळीत 650 कोटींचा फ्लाय ओव्हर
दाबोळी विमानतळावर ग्रेड सेपरेशनमधून प्रवासी आत येणे व बाहेर पडणे यात होणारा गोंधळ कमी करण्यासाठी आणि सध्या दाबोळीला वाढत्या प्रवाशांमुळे जी वाहतूक कोंडी होते, त्यावर कायम स्वरुपी उपाययोजना म्हणून फ्लाय ओव्हरच्या उभारणीस मान्यता दिली आहे. त्याचा आराखडा देखील निश्चित झाला आहे. रु. 650 कोटींच्या या प्रकल्पाचे बांधकाम पुढील दोन वर्षांच्या आत जलद गतीने पूर्ण होईल. या प्रकल्पाचा सारा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी गुदिन्हो यांना दिली आहे.
पणजी, फोंडा, म्हापसा, वास्कोत बसपोर्ट
मंत्री गडकरी यांनी गोव्यातील 16 बसस्थानकांचे बसपोर्टमध्ये रुपांतर करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यातील पणजी, फोंडा, म्हापसा व वास्को या बसस्थानकांचे काम युद्धपातळीवर हाती घेतले जाईल. त्याचा सारा खर्च केंद्र सरकार करील. या बसस्थानकांतून जो काही महसूल मिळेल तो केंद्र व राज्य सरकार वाटून घेईल. 20 वर्षानंतर हे बसपोर्ट गोवा सरकारच्या ताब्यात जातील. इतर बसस्थानकांचे रुपांतरही बसपोर्टमध्ये होईल. हे प्रकल्प फारसा महसूल मिळवून देईल याची शाश्वती नाही. तरीदेखील केंद्र सरकार त्यासाठीचा खर्च करणार आहे, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे.









