वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनमधील हेंगझोयू येथे 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 634 जणांच्या भारतीय चमूला केंद्रीय क्रीडा युवजन खात्याकडून अधिकृत मंजुरी मिळाली आहे. या प्रतिष्ठेच्या आगामी स्पर्धेत भारताचे स्पर्धक विविध 38 क्रीडा प्रकारात आपला सहभाग दर्शवून पदक मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत.
2018 साली झालेल्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत 572 क्रीडापटूंचा भारतीय संघ सहभागी झाला होता आणि त्या स्पर्धेमध्ये 16 सुवर्णपदकांसह एकूण 70 पदकांची कमाई केली होती. चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्स या प्रकारात भारताचे सर्वाधिक म्हणजे 65 अॅथलिटस् सहभागी होणार असून त्यात 34 पुरूष आणि 31 महिलांचा समावेश आहे. केंद्रीय क्रीडा युवजन खात्याने शुक्रवारी आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत 38 क्रीडा प्रकारात भाग घेणाऱ्या भारतीय क्रीडापटूंना अधिकृत मंजुरी दिली आहे. यामध्ये 44 फुटबॉलपटूंचा समावेश आहे. या आगामी स्पर्धेसाठी पुरूष आणि महिला फुटबॉल संघातील प्रत्येकी 22 फुटबॉलपटूंना मंजुरी देण्यात आली आहे. सांघिक क्रीडा प्रकारातील हॉकी या क्रीडा प्रकारासाठी एकूण 36 भारतीय हॉकीपटू सहभागी होत आहेत. पुरूष आणि महिलांच्या हॉकीसंघामध्ये प्रत्येकी 18 हॉकीपटूंचा समावेश राहील. अलिकडच्या कालावधीत नेमबाजी या क्रीडा प्रकारामध्ये सध्या सुरू असलेल्या विविध आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांच्या कामगिरीत सातत्य दिसत आहे. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 30 नेमबाजांचा संघ सहभागी होईल. त्याचप्रमाणे 33 सदस्यांच्या नौकानयन चमूला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून अधिकृत मंजुरी मिळाली आहे. दरम्यान वेटलिफ्टींग, जिम्नॅस्टीक, हँडबॉल आणि रग्बी या क्रीडा प्रकारातील एकाही पुरूष स्पर्धकाला मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आलेली नाही. मार्शल आर्ट (कुराश), वेटलिफ्टींग (दोन महिला), तसेच एकमेव जिम्नॅस्टचा भारतीय चमूत समावेश करण्यात आला आहे.









