शेवटच्या दिवशी 1499 अर्ज : आज होणार छाननी,उद्या अर्ज मागे घेण्याचा दिवस,बार्देशमधून सर्वात जास्त 1263 अर्ज,धारबांदोडामधून सर्वात कमी 172 अर्ज
प्रतिनिधी /पणजी
सोमवारी पंचायत निवडणुकीसाठी एकूण 1499 उमेदवारी अर्ज सादर झाले असून आतापर्यंत एकूण 6256 अर्ज आले आहेत. राज्यातील 186 पंचायतींसाठी हे अर्ज आले असून सर्वात जास्त अर्ज बार्देश तालुक्यामधून 1263 दाखल झाले आहेत तर सर्वात कमी अर्ज धारबांदोडा तालुक्यामधून आले आहेत. त्यांची संख्या 172 आहे.
सोमवारी दाखल झालेले तालुकानिहाय अर्ज पुढीलप्रमाणे ः पेडणे – 79, डिचोली – 124, सत्तरी – 98, बार्देश 274, तिसवाडी – 157, फोंडा – 218, धारबांदोडा – 70, सांगे – 64, सालसेत – 179, मुरगांव – 38, केपे – 116, काणकोण – 82.
बुधवारी चित्र होणार स्पष्ट
सोमवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस होता. आज मंगळवारी अर्जांची छाननी होणार असून बुधवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. उमेदवारांनी एकापेक्षा अनेक अर्ज सादर केल्यामुळे एकूण अर्जांची संख्या वाढली असून छाननीत काही अर्ज बाद ठरतील तर अनेकजण अर्ज मागे घेणार असल्याने अर्जांची संख्या कमी होऊन बुधवारी चित्र स्पष्ट होणार आहे. पंचायत निवडणूक 10 ऑगस्ट रोजी होणार असून मतमोजणी 12 ऑगस्टला करण्यात येणार आहे.
विविध पक्षांचे कार्यकर्ते रिंगणात
पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर नसली तरी विविध राजकीय पक्षांनी आपापले कार्यकर्ते – पदाधिकारी निवडणुकीत उतरवले आहेत. त्यामुळे पंचायत पातळीवर सदर निवडणूक पक्षीय राजकारणातूनच होणार आहे. अनेक उमेदवारांनी आपापला प्रचार वॉर्डातून सुरू केला असून त्यांना आता फक्त 15 दिवसच त्यासाठी मिळणार आहेत.
तालुकानिहाय एकूण अर्ज
- पेडणे – 515
- डिचोली – 488
- सत्तरी – 355
- बार्देश – 1263
- तिसवाडी – 691
- फोंडा – 733
- धारबांदोडा – 172
- सांगे – 211
- सालसेत – 994
- मुरगांव – 282
- केपे – 311
- काणकोण – 241