भारतीय सैन्याकडून निविदा जारी ः स्टील कोर बुलेट्सपासून करणार सुरक्षा
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दहशतवाद्यांकडून स्टील कोर गोळय़ांचा वापर होत असल्याने भारतीय सैन्याने सीमावर्ती क्षेत्रात तैनात सैनिकांसाठी 62,500 बुलेटप्रूफ जॅकेट्स प्राप्त करण्याकरता निविदा जारी केली आहे. हे जॅकेट या सैनिकांना स्टील कोर गोळय़ांपासून वाचवू शकणार आहे. संरक्षण मंत्रालयाने मेक इन इंडिया अंतर्गत या जॅकेट्ससाठी दोन वेगवेगळय़ा निविदा जारी केल्या आहेत. यातील एक सामान्य मार्ग अंतर्गत 47,627 जॅकेट्सकरता तर दुसरी निविदा आपत्कालीन खरेदी प्रक्रियांच्या अंतर्गत 15,000 जॅकेट्ससाठी आहे. पुढील 3 ते 4 महिन्यांमध्ये या खरेदी प्रक्रियेला अंतिम स्वरुप दिले जाणार आहे.
47,627 जॅकेट्सची खरेदी दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया 18-24 महिन्यांमध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 7.62 मिमी आर्मर-पियर्सिंग रायफल दारूगोळय़ासह 10 मीटरच्या अंतरावरून डागण्यात आलेल्या स्टील कोर बुलेट्सपासून सैनिकाला वाचविण्यास सक्षम असावे असे सैन्याकडून निविदा निकषांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
काश्मीर खोऱयात दहशतवाद्यांनी हल्ल्यादरम्यान अमेरिकेकडून निर्मित कवचभेदी गोळय़ांचा वापर केला आहे. सैनिकांच्या बुलेटप्रूफ जॅकेट्सना या गोळय़ांनी भेदले होते. अमेरिकेच्या सैन्याने एपीबीएस सोबत एम-16 असॉल्ट रायफल्स तसेच एम-4 कार्बाइन्सचा वापर अफगाणिस्तानात केला होता. परंतु अफगाणिस्तानातून बाहेर पडताना ही शस्त्रs तेथून सोडून दिली होती. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्याने ही शस्त्रs दहशतवाद्यांना मिळू लागली आहेत.
याचमुळे नव्या प्रकारच्या बुलेटप्रूफ जॅकेट्स खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन निविदांच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणारे जॅकेट स्टेज 4 प्रकारातील असेल, याला स्टील कोल बुलेटविरोधात प्रभावी मानले जाते. या बुलेटप्रूफ जॅकेट्स प्रथम जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये तैनात सैनिकांना प्रदान करण्यात येणार आहेत. संबंधित बुलेटप्रूफ जॅकेट भारतातच तयार केलेले असेल आणि याची सामग्री शत्रूदेशाकडून मिळविण्यात आलेली नसेल याची खातरजमा सैन्याकडून करण्यात येणार आहे.