13 हजार 850 खटले काढले निकालात
बेळगाव : राष्ट्रीय लोकअदालतीमधून खटले निकालात काढण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकअदालतीमध्ये 13 हजार 850 खटले निकालात काढण्यात आले. एनआय अॅक्ट, जमिनीसंदर्भातील नुकसानभरपाई, अपघात विमा, पोटगीसंदर्भातील अधिक खटले निकालात काढण्यात आले. त्यामध्ये एकूण 62 कोटी 7 लाख 49,928 रुपयांची देवघेव झाली आहे. राष्ट्रीय लोकअदालतीमधून प्रलंबित खटले निकालात काढण्यावर भर दिला जात आहे. या लोकअदालतीत 29,739 खटले निकालात काढण्यासाठी घेण्यात आले होते. त्यामधील 13,850 खटले निकालात काढले गेले आहेत. उर्वरित खटले काही कारणांनी प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. वादी-प्रतिवादी यांना समोरासमोर बसवून खटले निकालात काढले जात आहेत. यामध्ये पक्षकाराला कोणताही खर्च नाही, विनामूल्य ही सेवा दिली जात आहे. त्यामुळे या लोकअदालतीला प्रोत्साहन मिळत आहे. संपूर्ण जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये हे खटले निकालात काढण्यात येत आहेत. बँक, सोसायटीसंदर्भातील 899 खटले निकालात काढण्यात आले. त्यामध्ये 1 कोटी 91 लाख 43,932 रुपयांची देवघेव झाली. जमिनीसंदर्भातील 1,529 खटले निकालात काढले गेले. त्यामध्ये 39 कोटी 90 लाख 67,132 रुपये जमिनीसंदर्भातील नुकसानभरपाई देण्यात आली आहे. फौजदारी खटल्यामध्येही 11,122 खटले निकालात काढण्यात आले. त्यामध्येही तब्बल 1 कोटी 67 लाख 14 हजार रुपयांची देवाणघेवाण झाली आहे. ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सर्वच न्यायालयाच्या न्यायाधीशांनी प्रयत्न केले. मुख्य न्यायालयाचे न्या. मुस्तफा हुसेन एस. ए. यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत पार पडली.
निकाल…
अपघात विमासंदर्भात 185 खटले निकालात काढण्यात आले. 1 कोटी 79 लाख 38,600 रुपयांची देवघेव झाली आहे. कौटुंबिक न्यायालयातील घटस्फोट व पोटगीसंदर्भातील खटले निकालात काढले गेले. एकूण 115 खटले निकालात काढले गेले. त्यामध्ये 26 लाख 33,250 रुपयांची प्रलंबित पोटगी देऊन खटले निकालात काढले आहेत.









