केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मंजुरी, पालकमंत्री सुरेश खाडे यांची माहिती
प्रतिनिधी/मिरज
राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 च्या पेठ नाका ते सांगली रस्त्याच्या चौपदरीकरण कामासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी 611.60 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असल्याची माहिती कामगारमंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्त्याचे काम मार्गी लागले असून, नेहमीच अपघातांचा आणि मृत्यूच्या शृंखलेचा कलंक लागलेल्या सांगली-पेठ रस्त्याचे भाग्य अल्पावधीतच उजळणार आहे.
कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे हे दोन दिवस दिल्लीच्या दौऱयावर आहेत. बुधवारी केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत शासकीय निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे संचालक अलोक कुमार, राष्ट्रीय राजमार्गाचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत खोडस्कर, रस्ते व वाहतुक मंत्रालयाचे मुख्य अभियंता ओ. पी. श्रीवास्तव, केंद्रीय मंत्र्यांचे खाजगी सचिव संकेत भोंडवे उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री खाडे यांनी सांगली जिल्ह्यातील विविध रस्ते विकासावर चर्चा केली. सांगली शहरातून पुणे-मुंबई या महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱया अत्यंत व्यस्त रहदारी असलेल्या पेठ नाका ते सांगली या रस्त्याचे चौपदरीकरण करावे, अशी प्रमुख मागणी खाडे यांनी केली. वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी व त्यामुळे होणारे नागरिकांचे हाल याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अवगत केले. नागरिकांची अनेक वर्षापासूनची या रस्त्याच्या चौपदरीकरणाची मागणी असून, त्याबाबतची कार्यवाही तात्काळ करावी, असे साकडे पालकमंत्र्यांनी घातले.
यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगली-पेठ रस्त्यासाठी 611.60 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देऊन सदर कामाची निविदा तात्काळ प्रसिध्द करण्याचे निर्देश संबंधीत विभागाला दिले. प्रशासकीय कार्यवाही पूर्ण होवून प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून या रस्त्यावरील खड्डे भरून रस्ता तात्पुरत्या स्वरुपात वाहतूक योग्य करावा, अशा सूचनाही संबंधित यंत्रणेला दिल्या.
या चौपदरीकरणाने सांगली-पेठ नाका रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार असून, या सोबत मुंबई-पुणे या शहराला जाण्यासाठीचा प्रवासातील वेळही कमी होणार आहे. तसेच शेती व शेतमाल वेळेवर पोहोचविण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे शेतकरी व व्यापारी वर्ग व नागरिकांची सोय होणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील दळणवळण व वाहतूक करणाऱया उद्योग-व्यवसायिकांनाही लाभ होईल. पेठ नाका ते सांगलीपर्यंतच्या वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याची ग्वाही पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली.