साओ पाउलोच्या विन्हेदो शहरातील घटना, एका मिनिटात 17 हजार फूट आले खाली निवासी भागात
वृत्तसंस्था/ साओ पाउलो
ब्राझीलमधील साओ पाउलो राज्यातील विन्हेदो शहरात 61 जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले. मृतांमध्ये 57 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते. हा अपघात कसा झाला हे कळू शकलेले नाही. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. साओ पाउलोच्या ग्वाऊलहोस आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचे व्होईपास एअरलाईन्सने सांगितले.
फ्लाईट ट्रॅकिंग डेटावरून असे दिसून आले की विमानाने अपघाताच्या दीड मिनिट आधी उंची गमावली होती. स्थानिक वेळेनुसार दुपारी 1:21 पर्यंत विमान 17 हजार फूट उंचीवर उडत होते. यानंतर अवघ्या 10 सेकंदात ते सुमारे 250 फूट खाली आले. पुढच्या आठ सेकंदात ते सुमारे 400 फूट वर गेले. 8 सेकंदानंतर ते 2 हजार फूट खाली पोहोचले. मग, जवळजवळ लगेच, ते वेगाने खाली येऊ लागले. ते अवघ्या एका मिनिटात अंदाजे 17 हजार फूट खाली पडले आणि आग लागली, असे कंट्रोल रुममधील नोंदींमध्ये आढळून आले आहे.
एका निवासी घराचे नुकसान
दुर्घटनाग्रस्त विमान निवासी भागात कोसळले. परंतु सुदैवाने विमानाबाहेरील लोकांपैकी कोणतीही जीवितहानी झाली नाही. एका निवासी घराचे नुकसान झाले आहे. हे विमान पॅस्केवेलहून निघाले होते आणि ते साओ पाउलोला जात होते. ब्राझीलच्या वेळेनुसार दुपारी दीड वाजता त्याचे सिग्नल गायब झाले. हा अपघात कसा झाला याची अद्याप पुष्टी झालेली नाही, असे एअरलाईन व्होईपासने सांगितले.
अग्निशमन दलाची 7 पथके तैनात
विमान दुर्घटनेनंतर लष्करी पोलिसांसह 7 पथके तैनात करण्यात आली होती. सरकारी निवेदनानुसार, लिगल मेडिकल इन्स्टिट्यूटची टीम आणि मृतदेह गोळा करण्यासाठी जबाबदार असलेले लोकही घटनास्थळी पाठवण्यात आले होते. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी या दुर्घटनेनंतर मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे.