महिलांसाठी जणू दुसरेच घर
घटस्फोट कुठल्याही विवाहित दांपत्य, कुटुंब किंवा समाजासाठी दु:खाचे कारण ठरत असते. घटस्फोट झाल्यावर केवळ दोन व्यक्ती नव्हे तर कुटुंबही विभक्त होते , अशा स्थितीत दांपत्याच्या अपत्यांवरही प्रतिकूल परिणाम होतो. घटस्फोटाला चांगले म्हणता येणार नाही, परंतु नाते टिकवून ठेवणे असह्या झाल्यावर घटस्फोट हाच एकमेव मार्ग शिल्लक राहतो. अनेक समुदायांमध्ये घटस्फोटाला वाईट मानले जाते, घटस्फोटानंतर महिलेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, परंतु जपानमध्ये घटस्फोटित महिलांना सशक्त करण्यासाठी शेकडो वर्षांपूर्वी एका मंदिराची निर्मिती करण्यात आली होती. हे मंदिर अशा महिलांचे जणू दुसरे घरच ठरले होते. या मंदिराला घटस्फोट मंदिर म्हणूनच ओळखले जाते.

जपानच्या कनागवा प्रांतातील कामाकुर शहरात असलेल्या मतसुगाओगा तोकेई जी मंदिराला ‘डिव्होर्स’ टेम्पल’ या नावाने ओळखले जाते. हे 600 वर्षे जुने मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती जपानी महिलांकडे कुठलेच अधिकार नसलेल्या काळात झाली आहे. त्या काळात जपानी महिला घरगुती हिंसाचार अन् अत्याचाराला बळी पडत होत्या. अशा पीडित महिलांना या मंदिराकडून आसरा दिला जात होता. या मंदिरातच अशा पीडित महिला वास्तव्य करत होत्या.
हे एक बौद्ध धर्माचे मंदिर असून ते 1285 मध्ये काकुसान शीडो-नी यांनी निर्माण केले होते. 1185-1333 दरम्यान जपानी महिलांची स्थिती अत्यंत दयनीय होती. त्यांच्याकडे कुठलेच अधिकार नव्हते. याचबरोबर त्यांच्यावर अनेक सामाजिक बंधने लादली जात होती. अशा स्थितीत स्वत:च्या वैवाहिक आयुष्यात आनंदी नसलेल्या महिलांना या मंदिराचा आसरा मिळत होता. काही काळानंतर हे मंदिर अशा महिलांना अधिकृत स्वरुपात घटस्फोटाचे प्रमाणपत्र देऊ लागले होते. यामुळे या महिलांना स्वत:चे जीवन चांगल्याप्रकारे जगण्याची आणखी एक संधी मिळू शकली होती. हे प्रमाणपत्र कायदेशीर स्वरुपात महिलांना विवाहापासून मुक्ती मिळवून देत होते. सद्यकाळात या मंदिराला महिलांना सशक्त करण्याचे एक प्रतीक मानले जाते.









