80 टक्के लसीकरणानंतर सरकारचा दिलासा -विदेशात अडकून पडलेले 50 हजारांहून अधिक लोक परतणार
वृत्तसंस्था/ कॅनबेरा
सुमारे 600 दिवसांनी ऑस्ट्रेलियाच्या विमानतळांवर रेलचेल दिसून आली आहे. विमानतळ परिसरात सुमारे दोन वर्षांपासून दुरावलेल्या कुटुंबांच्या मिलनाच्या भावुक दृश्यं ठिकठिकाणी दिसून येत आहे. 20 मार्च 2020 रोजी कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या सरकारने स्वतःच्या देशाच्या सीमा बंद केल्या होत्या. त्यादरम्यान देशाबाहेर प्रवास करणारे ऑस्ट्रेलियन नागरिक विदेशात अडकून पडले होते. 1 नोव्हेंबरपासून बंदी हटल्यावर विदेशात अडकून पडलेले 50 हजारांहून अधिक नागरिक मायदेशी परतत आहेत. या नियमांच्या अंतर्गत ऑस्ट्रेलियातील लोकांनाही सरकारच्या अनुमतीशिवाय देशाबाहेर जाता येत नव्हते.
सिडनी आणि मेलबर्नमध्ये विमानोड्डाणे सुरू झाली आहेत. पण पश्चिम ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया या राज्यांनी आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणांना अनुमती दिलेली नाही. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी विदेशात अडकलेले आणि पूर्ण लसीकरण झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांना परत आणण्यास कुठलाच अडथळा निर्माण केला जाऊ नये. आम्हाला लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि पर्यटकांसाठीही सुरक्षित पद्धतीने देश खुला करावा लागणार असल्याचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी म्हटले आहे.
संक्रमणावर बऱयापैकी नियंत्रण

ऑस्ट्रेलियात आतापर्यंत 1.70 लाख कोरोनाबाधित सापडले असून यातील 1,700 जणांचा मृत्यू ओढवला आहे. आगामी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस टूर्नामेंटमध्ये लस न घेतलेल्या खेळाडूंना 14 दिवसांसाठी क्वारेंटाइन रहावे लागणार असल्याचे व्हिक्टोरिया सरकारने स्पष्ट केले आहे. याचदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या सरकारने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मान्यता दिली आहे.
नियमाचा भंग केल्यास..
व्हिक्टोरिया राज्याकडून कोरोना विषयक नियमाचा भंग करणाऱया व्यक्तीवर 50 लाख रुपयांचा दंड आणि दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद असणारा कायदा आणला जाणार आहे. तसेच जाणूनबुजून लस न घेणाऱया लोकांनाही याच्या कक्षेत आणले जाईल. एखाद्या व्यावसायिक संघटनेने नियमांचे उल्लंघन केल्यावर 2.5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.
थायलंडकडूनही परवानगी
18 महिन्यांच्या बंदीनंतर बँकॉक शहर विदेशी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. नव्या सवलतीच्या अंतर्गत 14 दिवस क्वारेंटाइन न राहता पर्यटक थायलंडमध्ये फिरू शकणार आहेत. पण याकरता लसीकरण झालेले आवश्यक आहे. कोरोना महामारीचा थायलंडच्या अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडला आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा बळ प्राप्त करून देण्यासाठी सरकारने अमेरिका, चीन, भारतासह 60 हून अधिक देशांच्या पर्यटकांना अनुमती दिली आहे.









