केंद्रीय कामगार मंत्रालयाची माहिती : रोजगार निर्मितीला चालना
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
केंद्र सरकाने 7 नोव्हेंबरच्या एका कार्यक्रमात विविध केंद्रीय विभागांमध्ये एकंदर 60 हजार युवकांनी नियुक्तीपत्रे दिली आहेत, अशी माहिती केंद्रीय कामगार विभागाने दिली आहे. या वर्षी आतापर्यंत 1 कोटी युवकांना विविध मान्यवर कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधीही मिळवून देण्यात आली आहे. केंद्र सरकारने रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रभावी योजना सज्ज केली असून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिपादन विभागाने केले आहे. केंद्र सरकारने सरकारी खर्चाचे प्रमाण वाढविले आहे. 4.19 लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प क्रियान्वित करण्यात आले असून त्यातून 1 कोटी 26 लाख नवे रोजगार निर्माण होणार आहेत.
महाराष्ट्रासाठी 76 हजार कोटी रुपयांची योजना असून त्यातून 12 लाख नवे रोजगार निर्माण होणार आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये 12 औद्योगिक स्मार्ट शहरे निर्माण करण्यात आली असून 40 लाख नवे रोजगार या प्रकल्पांमधून निर्माण झाले आहेत. गुजरातमधील राष्ट्रीय समुद्री वारसा संकुलाची निर्मिती करण्यात आली असून या प्रकल्पातून 22 हजार जणांना रोजगार मिळाला आहे. तामिळनाडू राज्यातील चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या माध्यमातून 9 हजार कुशल आणि 7 हजार 500 अर्धकुशल युवकांना रोजगार दिला गेला आहे. तसेच कृषी पायाभूत सुविधांचा विस्तार करणाऱ्या प्रकल्पांमधून आणखी 8.7 लाख युवकांना रोजगार दिला जात आहे, अशी महत्वपूर्ण माहितीही केंद्रीय कामगार विभागाने दिली असून आणखी रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न होत आहेत. नवे प्रकल्प हाती घेतले जात आहेत, असे प्रतिपादन केले आहे.
बेरोजगारी संबंधीचे आरोप अतिरंजित
देशात प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आहे, असा आरोप काही लोकांकडून केला जातो. तथापि, तो अतिरंजित आहे. केंद्र सरकारच्या सर्व विभागांनी रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले असून या प्रयत्नांना आता यशही येत आहे. कौशल्यवान युवकांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी विशेष शिक्षणक्रमांची योजना आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.









