92 पैकी 32 प्रभागात चिठ्ठय़ा काढून आरक्षण निघणार
22 प्रभागातील ‘ओपन’मधील इच्छुकांचा पत्ता कट
कोल्हापूर / विनोद सावंत
कोल्हापूर महापालिकेची निवडणूक आता ओबीसी आरक्षणासह होणार आहे. 29 जुलै रोजी आरक्षण सोडत आहे. यामध्ये सरसकट 92 जागांचे आरक्षण निघणार नाही. यातील 60 प्रभाग थेट आरक्षित होणार आहेत. यामध्ये महापालिकेने यापूर्वी काढलेले ‘अनुसूचित’चे 13 प्रभागातील आरक्षण कायम राहणार आहे. तसेच 18 प्रभाग ओबीसीसाठी आणि 29 प्रभाग ओपन महिलांसाठी थेट आरक्षित केले जाणार आहेत. त्यामुळे केवळ 32 प्रभागामध्येच चिठ्ठी टाकून आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार कोल्हापूर महापालिका निवडणूकीसाठी ओबीसी आरक्षण लागू झाले आहे. यामुळे 31 मे 2022 रोजी महापालिकेने ओबीसी शिवाय काढलेले ओपनमधील आरक्षण रद्द करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने 29 जुलै रोजी ओबीसीसह आरक्षण सोडत काढण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. मात्र, यापूर्वी काढण्यात आलेले अनुसूचित जातीचे 12 प्रभाग आणि अनुसूचित जमातीचा 1 प्रभागाचे काढण्यात आलेले आरक्षणात कोणताही बदल होणार नाही. यामुळे 29 जुलै रोजी ओबीसी, ओबीसी महिला आणि ओपन महिला या प्रवर्गातील आरक्षण सोडत होणार आहे. यामध्ये 11 प्रभाग ओबीसी आणि 11 प्रभाग ओबीसी महिलांसाठी आणि 29 प्रभाग ओपन महिलांसाठी आरक्षित होणार आहेत.
18 प्रभागात थेट ओबीसीचे आरक्षण
31 वॉर्डमधील 13 पोट प्रभाग ‘अनुसुचित’साठी यापूर्वीच आरक्षित झाले आहेत. त्यामुळे उर्वरीत 18 वॉर्डमधील 18 पोट प्रभाग चिठ्ठा न टाकता थेट ओबीसीसाठी आरक्षित केले जाणार आहे. त्यामुळे 31 वॉर्डमधील प्रत्येक एक प्रमाणे 31 पोट प्रभाग आरक्षित असणार हे नक्की आहे.
अशी होणार आरक्षण सोडत
-यापूर्वी काढण्यात आलेल्या 13 अनुसूचित प्रभागांचे नावे जाहीर करणे.
-31 वॉर्डपैकी उर्वरीत 18 पोट प्रभागात थेट ओबीसी आरक्षण टाकणे
-ओबीसीचे उर्वरीत चार प्रभागांचे चिठ्ठया काढून आरक्षण काढणे.
-22 ओबीसी प्रभागातील 11 प्रभाग महिलांसाठी आरक्षित करणे.
-शिल्लक 57 प्रभागातून चिठ्ठय़ाने 29 प्रभाग महिला ओपनसाठी आरक्षित करणे.
-शिल्लक राहणारे 28 प्रभाग थेट सर्वसाधारण प्रभाग म्हणून घोषित करणे.
ओपनसाठी 57 प्रभागात संधी
महापलिकेचे ओबीसी आरक्षण लागू होण्यापूर्वी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये 79 प्रभाग ओपनसाठी होते. यामुळे 31 वॉर्डमध्ये पोट तीन प्रभागांपैकी एक प्रभाग ओपन झाला होता. त्यामुळे सर्वांनाच निवडणूक लढविण्याची संधी मिळाली होती. आता 79 ओपनमधील 22 प्रभाग ओबीसीसाठी आरक्षित होणार असून 57 प्रभाग ओपनसाठी असणार आहेत. यामध्ये 29 प्रभाग ओपन महिलांसाठी असणार आहेत.
त्रिसदस्यीय प्रभागानुसारच निवडणूक
भाजपच्या नेत्यांनी त्रिसदस्यीय प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. यामुळे पुन्हा एक सदस्यीय प्रभाग रचना होईल, अशी चर्चा होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिल्याने आता त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब झाला आहे.