60 टक्के भारतीय युक्रेनबाहेर, परराष्ट्र विभागाचे प्रतिपादन, नागरिकांना भारतात आणण्याची प्रक्रिया वेगवान, पुन्हा युपेन-रशिया चर्चा
@ कीव्ह, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
युपेन आणि रशिया यांच्यातील युद्ध आणखी चिघळल्यामुळे भारताने तेथून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी वेगाने प्रयत्न चालविला आहे. बुधवारी हंगेरीची राजधानी बुडापेस्टमधून 218 विद्यार्थी आणि नागरिकांना परत आणण्यात आले. सुटका झाल्याचा आनंद या नागरिकांनी व्यक्त केला. भारत येत्या एका आठवडय़ात 26 विमानफेऱया करणार असून सहा हजारांहून अधिकांची सुटका करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली.
आतापर्यंत 60 टक्के भारतीय युक्रेनबाहेर सुरक्षित स्थानी गेल्याचे प्रतिपादन भारताच्या परराष्ट्र विभागाने केले आहे. अद्यापही तेथे अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी परिणामकारक व्यवस्था केली जात असून सर्व भारतीयांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले. युपेनमध्ये साधारणतः 20 हजार भारतीय नागरिक आणि विद्यार्थी व्यवसाय आणि शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत.
वायुदलावर परिणाम नाही
युक्रेनवर हल्ला केल्याने रशियावर अनेक संपन्न देशांनी आर्थिक निर्बंध लादले आहेत. रशियाच्या निर्यातीवरही बंधने घालण्यात आली आहेत. भारत हा रशियाच्या संरक्षण साधनांचा मोठा ग्राहक आहे. भारताच्या वायुदलात रशियन बनावटीची अनेक विमाने आहेत. तरीही रशियावर घालण्यात आलेल्या व्यापार आणि आर्थिक निर्बंधांचा विपरीत परिणाम भारताच्या वायुशक्तीवर होणार नाही, असे दिलासायुक्त प्रतिपादन वायुदलाचे उपप्रमुख संदीप सिंग यांनी केले.
रशियाची आगेकूच सुरुच
रशियाने युक्रेनच्या आणखी काही भागांवर ताबा मिळविला असून राजधानी कीव्हवर नियंत्रण मिळविण्यासाठी आगेकूच चालविली आहे. रशियन सैन्य आणि रणगाडे कीव्ह शहरापासून 15 किलोमीटरच्या आत पोहचले आहेत. प्रतिकार झाला नाही तर येत्या 24 तासांमध्ये रशियन सैन्य कीव्हमध्ये घुसण्याची शक्यता आहे. युद्धातील हिंसाचारात आणखी 14 लोकांचा बळी गेल्याचे वृत्त आहे.
भारतीयांना सुरक्षित मार्ग देणार
युक्रेनमधून सर्व भारतीयांना सुरक्षित बाहेर पडता यावे, यासाठी रशियाशी बोलणी सुरु आहेत. लवकरच भारतीय नागरिक व विद्यार्थ्यांना या देशाबाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्ग (सेफ पॅसेज) उपलब्ध करुन देण्यात येईल, असे रशियाचे स्पष्ट केले. या युद्धात भारताने रशियाला विरोध करणे नाकारल्याने युक्रेनचे प्रशासन तेथील भारतीयांना त्रास देत आहे, असा आरोप रशियाने केला.
अमेरिका सैन्य पाठविणार नाही
युक्रेनच्या बाजूने लढण्यासाठी अमेरिका आपले सैन्य तेथे पाठविणार नाही, असे त्या देशाचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी स्पष्ट केले. अमेरिकेने युक्रेनला शस्त्रे आणि अर्थसाहाय्य देण्याचे मान्य केले आहे. जर्मनीनेही तसे आश्वासन दिले आहे. तथापि, अद्याप शस्त्रपुरवठा सुरु झालेला नाही. त्यामुळे मित्रदेशांनी आपल्याला एकटे पाडले अशी युक्रेनच्या नागरिकांची भावना होत आहे. त्यामुळे तातडीने शस्त्रपुरवठा करावा, अशी मागणी युक्रेनच्या काही नेत्यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदी-मॅक्रॉन चर्चा
पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी युपेनसंबंधी चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर शस्त्रसंधी होऊन युद्ध थांबले पाहिजे, या मुद्दय़ावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. युद्ध लांबल्यास जगाच्या अर्थव्यवस्थेची अपरिमित हानी होऊन ती भरुन निघण्यास नंतर बराच वेळ लागेल., असा इशारा तज्ञांनी दिला असून त्यावरही दोन्ही नेत्यांची बोलणी झाली.
बॉक्स
आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू
युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. मात्र तो रशियाच्या हल्ल्यात झाला नसून पक्षाघाताच्या विकाराने झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. हा विद्यार्थी पंजाबमधील असून त्याचे नाव चंदन जिंदल असल्याचे समजते. त्याच्या मृत्यूचे वृत्त पोहचताच परराष्ट्र विभागाने युक्रेनमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून पुढील प्रक्रिया आणि व्यवस्था पूर्ण करण्याची सूचना दिली. चंदन याच्या कुटुंबियांनाही या घटनेसंबंधी माहिती कळविण्यात आली असून मृतदेह लवकरात लवकर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
बॉक्स
नवीनच्या मृत्यूची चौकशी करणार
रशियाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला कर्नाटकातील विद्यार्थी नवीन गोवरगोंडा याच्या मृत्यूची चौकशी करण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. रशियाच्या भारतातील दुतावासाकडून ही माहिती सरकारला देण्यात आली. नवीन खार्किव्ह येथे वास्तव्यास होता. तो धान्य आणावयास बाहेर गेला असताना बाँब हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. त्याला रशियाच्या सैनिकांनी गोळी घातली असा आरोप त्याच्या मित्रांनी केला आहे. त्यामुळे त्याच्या मृत्यूची चौकशी केली जाणार आहे.
बॉक्स
तिसरे महायुद्ध भयानक असेल ः रशिया
युक्रेन-रशिया संघर्षाचे पर्यवसान महायुद्धात झालेच तर ते युद्ध महाभयानक असेल, असे विधान रशियाचे संरक्षणमंत्री सर्जी लाव्हरोव्ह यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. या महायुद्धात अण्वस्त्रांचाही उपयोग होण्याची शक्यता असल्याने मोठय़ा प्रमाणात विनाश होईल, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र, त्यांची ही धमकी हा रशियाच्या दबाव तंत्राचा एक भाग असल्याचे काही तज्ञांचे मत आहे. अणुयुद्ध झाल्यास रशियाचीही अपरिमित हानी होईल. शिवाय त्याची उद्दिष्टय़ेही साध्य होणार नाहीत, असे या तज्ञांचे म्हणणे आहे. तथापि, रशियाच्या ज्येष्ठ मंत्र्याने केलेल्या या विधानामुळे अनेकांनी चिंताही व्यक्त केली आहे.
बॉक्स
बाहुले सरकार स्थापण्याचा प्रयत्न कीव्ह ताब्यात आल्यानंतर रशिया युक्रेनमध्ये आपले समर्थक असणारे बाहुले आणणार आहे. तशी योजना तयार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. सध्या रशियात राजाश्रय घेतलेले युक्रेनचे नेते व्हिक्टर यानुकोव्हिच यांच्या हाती युक्रेनची सूत्रे देण्याचा रशियाचा विचार आहे, अशी बोलवा आहे. यानुकोव्हिच हे रशियावादी नेते असून ते काही वर्षांपूर्वी युक्रेनमधून पळून रशियात गेले होते. रशियाने त्यांना आश्रय दिला असून आता त्यांना युक्रेनच्या प्रमुखपदी स्थानापन्न करुन त्यांच्या हातून रशिया युक्रेनवर अप्रत्यक्षरित्या









