डेरेक ओ ब्रायन, साकेत गोखले, इस्लाम यांना उमेदवारी
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसने सोमवारी राज्यसभेच्या 6 जागांसाठी स्वत:चे उमेदवार जाहीर केले आहेत. पश्चिम बंगालमध्ये चालू महिन्याच्या अखेरीस राज्यसभेची निवडणूक होणार आहे. या उमेदवारांमध्ये डेरेक ओ ब्रायन, सुखेंदु शेखर रे आणि डोला सेन यांचे नाव सामील आहेत. हे तिन्ही जण सध्या खासदार आहेत. ओ ब्रायन हे 2011 पासून खासदार असून राज्यसभेत तृणमूलचे गटनेते आहेत. तर सुखेंदु शेखर रे हे तृणमूलचे राज्यसभेतील उपमुख्य प्रतोद आहेत. डोला सेन 2017 मध्ये राज्यसभा खासदार झाल्या होत्या.

तृणमूलकडून यावेळी बांगला संस्कृती मंचाचे अध्यक्ष समीरुल इस्लाम, तृणमूलचे अलीपूरद्वारचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चिक बडाइक आणि आरटीआय कार्यकर्ते तसेच तृणमूल प्रवक्ते साकेत गोखले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ओ ब्रायन, रे आणि सेन यांच्यासोबत काँग्रेस खासदार प्रदीप भट्टाचार्य, तृणमूलच्या आसाममधील नेत्या सुष्मिता देव तसेच तृणमूलचे दार्जिलिंगमध्ये नेते शांता छेत्री यांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे.
एका जागेकरता पोटनिवडणूक
गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइजिन्हो फलेरियो यांनी एप्रिल महिन्यात राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यामुळे पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेसाठीची सातवी जागा रिक्त झाली आहे. 24 जुलै रोजी या 6 जागांच्या निवडणुकीसोबत त्या जागेकरता पोटनिवडणूक होणार आहे. राज्याच्या 294 सदस्यीय विधानसभेत तृणमूलचे 216 आमदार आहेत. तर तृणमूलला 5 भाजप आमदारांचे समर्थन प्राप्त आहे. या भाजप आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरीही विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. विधानसभेत भाजपचे 70 आमदार आहेत. पश्चिम बंगालसोबत गुजरात तसेच गोव्यातही राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे. 24 जुलै रोजीच राज्यसभा निवडणुकीसाठी मतमोजणी होणार आहे.
मतांचे समीकरण
पश्चिम बंगाल विधानसभेत 294 सदस्य असून राज्यसभेसाठीची प्रत्येक जागा जिंकण्यासाठी 43 आमदारांचे मत मिळवावे लागणार आहे. एका जागेवर भाजपचा विजय निश्चित आहे. तरीही भाजपकडे 34 आमदारांची मते अतिरिक्त असणार आहेत. तर 5 जागा जिंकण्यासाठी तृणमूलला 215 मतांची गरज भासणार आहे. तृणमूलचे काही आमदार विविध गुन्ह्यांच्या चौकशीप्रकरणी सध्या तुरुंगात कैद आहेत. अशा स्थितीत तृणमूलला पाचवी जागा जिंकण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. भाजपने दोन उमेदवार उभे केल्यास तृणमूलसमोर आव्हान निर्माण होणार आहे.









