अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण : नवीन भरतीकडे दुर्लक्ष
बेळगाव : मागील पाच वर्षांपासून वनखात्याच्या अ आणि ड श्रेणीतील 6 हजार 410 पदे रिक्त असल्याने वनखात्याच्या कारभारावर परिणाम होऊ लागला आहे. याबाबत वनप्रेमी आणि नागरिकांतूनही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. वनखात्यातील साहाय्यक वन संरक्षण, उपविभागीय वनाधिकारी, वननिरीक्षक आदी पदे रिक्त आहेत. त्यामुळे वनखात्याचा डोलारा विस्कळीत होऊ लागला आहे. विशेषत: डीआरएफओ आणि आरएफओ जागा रिक्त असल्याने सर्वाधिक फटका बसू लागला आहे. अलीकडे बेळगाव विभागातील खानापूर वनक्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची संख्या समाधानकारक टिकून आहे. त्यामुळे वनअधिकाऱ्यांवर जबाबदारी वाढली आहे. कर्मचाऱ्यांअभावी अधिकाऱ्यांना दोन-तीन विभागांच्या प्रभारी पदांवर कार्य करावे लागत आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढला आहे. 2019 मध्ये वनरक्षक पदासाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. अद्याप भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे वनखात्याचा कारभार सद्यस्थितीत असलेल्या कर्मचाऱ्यांवरच सुरू आहे. वनविभागात नोकरीसाठी बीएस्सी वनविज्ञान पदवीधर प्रतीक्षेत आहेत. खानापूर विभागातील भीमगड, नागरगाळी, हेम्मडगा, गोल्याळी, लोंढा, कणकुंबी आदी परिसरात वनक्षेत्र वाढले आहे. त्यामुळे विभागीय कार्यालयांची संख्यादेखील वाढली आहे. मात्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नसल्याने कार्यालये कर्मचाऱ्यांविना ओस पडू लागली आहेत
जागा भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा – शिवरुद्राप्पा कबाडी, एसीएफ वनखाते.
वनखात्यातील जागा भरण्यासाठी 2019 मध्ये अधिसूचना जारी करण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे त्यावेळी स्थगिती मिळाली होती. पुन्हा जागा भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. लवकरच रिक्त जागांवर नियुक्ती केली जाणार आहे.









