बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 2424 तर चिकोडी जिल्हय़ात 3773 पदे रिक्त
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा हा क्षेत्रफळाच्यादृष्टीने राज्यात सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कर्नाटक सरकारने या जिल्हय़ाला उपराजधानीचा दर्जा दिला असला तरी प्रत्यक्षात मात्र या जिल्हय़ाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बेळगाव जिल्हय़ात एकूण 6 हजार 197 शिक्षकांची पदे रिक्त असून, याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शिक्षकांची भरती करावी, अशी मागणी होत आहे.
बेळगाव जिल्हा क्षेत्रफळाने मोठा असल्याने नियोजनासाठी दोन शैक्षणिक जिल्हय़ांमध्ये विभागणी करण्यात आली. काही तालुके बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाला तर काही चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ाला जोडण्यात आले. कोरोनाकाळात खासगी शाळांची फी परवडत नसल्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना सरकारी शाळांमध्ये दाखल केले. विद्यार्थ्यांची संख्या वाढली तरी शिक्षकांची मात्र कमतरता आहेच.
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ामध्ये 2 हजार 424 तर चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ामध्ये 3 हजार 773 पदे रिक्त आहेत. एकीकडे सरकारकडून शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात असताना दुसरीकडे मात्र शिक्षकांची पदे भरून घेतली जात नसल्याने शैक्षणिक दर्जा घसरत आहे. त्यामुळेच मागील काही वर्षात बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत आहे. वर्षानुवर्षे कमी शिक्षकांवर शाळा सुरू केल्या जात आहेत. खानापूरसारख्या दुर्गम भागातील शाळांमध्ये एक ते दोन शिक्षकांवर पहिली ते सहावीपर्यंतचे वर्ग भरवावे लागत आहेत.
शिक्षकांची भरती होत नसल्यामुळे अतिथी शिक्षकांवर शाळांचा गाडा हाकला जात आहे. बऱयाचशा मराठी शाळांमध्ये कन्नड विषयांचे शिक्षक नसल्याचे दिसून येत आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातील 1 हजार 385 सरकारी प्राथमिक शाळांमध्ये 2 हजार 119 पदे रिक्त आहेत. तर चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ातील 1 हजार 789 सरकारी शाळांमध्ये 3 हजार 169 पदे रिक्त आहेत.
लवकरच पदे भरणार
शिक्षकांची कमतरता असली तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये कोणतीही अडचण येवू नये यासाठी अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. लवकरच रिक्त पदे भरली जाणार आहेत.
– बसवराज नलतवाड (जिल्हा शिक्षणाधिकारी)
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातील वस्तुस्थिती
| सरकारी प्राथमिक शाळा | 1385 |
| शिक्षकांची रिक्त पदे | 2197 |
| सरकारी उच्च प्राथमिक शाळा | 130 |
| माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे | 227 |
| एकूण रिक्त पदे | 2424 |
| प्राथमिक शाळांमधील अतिथी शिक्षक | 1232 |
| उच्च प्राथमिक शाळांमधील अतिथी शिक्षक | 179 |
| एकूण अतिथी शिक्षक | 1411 |









