बारामुल्ला, कोकरनागमध्ये कारवाई : चकमकीत 3 जवान जखमी
वृत्तसंस्था /श्रीनगर
काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराने बुधवारी रात्री संयुक्त कारवाईत 6 दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. बारामुल्ला आणि कोकरनागच्या अथलान भागात ही कारवाई करण्यात आली. या चकमकीत लष्कराच्या जवानांसह 3 जण जखमी झाले. अटक करण्यात आलेले दहशतवादी 15 ऑगस्टपूर्वी खोऱ्यात मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते, असे उघड झाले आहे. तसेच दहशतवादी कारवाया करण्यासाठी ते तोयबाच्या दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवत असल्याची बाबही प्राथमिक तपासात उघड झाली आहे. बारामुल्लाच्या उरीमध्येही सुरक्षा जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याविऊद्ध युएपीए आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामुल्ला पोलीस आणि लष्कराच्या 16 शीख लाईट इन्फंट्रीच्या सुरक्षा दलांनी गस्तीदरम्यान चुऊंडा उरी येथे एका संशयिताला पाहिले. सुरक्षा दलांना पाहून तो पळू लागला, मात्र सुरक्षा दलांनी त्याला पकडले. शौकत अली अवान असे त्याचे नाव असून तो उरी येथील रहिवासी आहे. त्याच्याकडून दोन ग्रेनेड जप्त करण्यात आले. अन्य दोघांची नावे अहमद दीन आणि मोहम्मद सादिक खटाना अशी असून ते चुऊंडा येथील रहिवासी आहेत. दहशतवाद्यांकडून दोन ग्रेनेड, एक चिनी पिस्तूल, एक पिस्तूल मॅगझिन आणि चार जिवंत राऊंडही जप्त करण्यात आले आहेत. हे दहशतवादी पाकिस्तानी हस्तकांच्या सांगण्यावरून सीमेपलीकडून शस्त्रास्त्रांची तस्करी करत होते.









