हरियाणातील दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश : मुख्याध्यापक ताब्यात, चालकाला अटक
वृत्तसंस्था /महेंद्रगड, अंबाला
हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यात विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूलबस उलटल्याची घटना गुरुवारी घडली. यामध्ये 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अनेक मुले गंभीर जखमी झाली आहेत. जीएल पब्लिक स्कूल या खासगी शाळेच्या बसमध्ये सुमारे 35 मुले प्रवास करत असताना जिह्यातील कनिना उपविभागातील उन्हाणी गावाजवळ अपघात घडला. या भीषण अपघातात 6 मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताचा व्हिडीओही समोर आला असून तो खूपच भयानक आहे. अपघातग्रस्त बसचा चालक दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकाला शाळेतून ताब्यात घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. बस पलटी झाल्यानंतर पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. यानंतर मुलांना तातडीने ऊग्णालयात पाठवण्यात आले. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. अपघाताची माहिती मुलांच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी उपस्थित लोकांनी जखमी मुलांना निहाल हॉस्पिटल आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गंभीर जखमींना प्राथमिक उपचारानंतर उच्च केंद्रात पाठवण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये अपघाताचे कारण ओव्हरटेक असल्याचे सांगण्यात आले आहे. कनिना ते धनौंडा या मार्गावर शासकीय कन्या महाविद्यालयासमोर बस उलटली.
सरकारी सुट्टी असूनही शाळा सुरू
रमजान ईदनिमित्त गुरुवारी सरकारी सुट्टी असतानाही जीएल पब्लिक स्कूल चालू ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. ड्रायव्हर अतिवेगाने बस चालवत असल्यामुळे स्कूलबस उलटल्याचा दावा करत ईदच्या दिवशी शाळा का सुरू होती, याचाही तपास करत आहोत. अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे कनिना डीएसपी मोहिंदर सिंग यांनी सांगितले. प्रशासनाने उच्च अधिकारी व शासनाकडे शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवल्याचे जिल्हा उपायुक्त मोनिका गुप्ता यांनी सांगितले.
शाळा व्यवस्थापनावर कारवाई
हरियाणाच्या महेंद्रगढ जिह्यात झालेल्या रस्ते अपघातात आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर हरियाणा सरकारने मोठी कारवाई केली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका दिप्ती राव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांनी शाळा व्यवस्थापनाकडून स्कूलबससंबंधीची काही कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. या संपूर्ण प्रकरणावर मुख्याध्यापकांनी मौन पाळले आहे. यासंबंधी शिक्षणमंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना घटनेबाबत योग्य तपास करून सर्व संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच गरज पडल्यास शाळेची मान्यता रद्द करण्याची तयारीही दर्शवली आहे.
…तर मुलांचे प्राण वाचले असते!
प्राचार्य दिप्ती यांचा घोर निष्काळजीपणा समोर आला आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती ग्रामस्थांनी मुख्याध्यापकांना दिली होती. मुख्याध्यापकांनी आज चालकाला जाऊ द्या, उद्यापासून काढून टाकले जाईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. मात्र, मुख्याध्यापकांनी तातडीने योग्य ती कारवाई केली असती तर मुलांचे प्राण वाचले असते, अशा भावना व्यक्त होत आहेत.