दिल्ली प्रीमियर लीगमध्ये षटकारांचा पाऊस : युवा प्रियांशने युवराज सिंगप्रमाणे केली धुलाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली प्रीमियर लीग 2024 मध्ये इतिहास घडला आहे. प्रियांश आर्यने युवराज सिंगप्रमाणे एकाच षटकात 6 षटकार मारण्याची किमया केली आहे. डीपीएलमध्ये शनिवारी दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स आणि उत्तर दिल्ली स्ट्रायकर्स यांच्यात झालेल्या सामन्यात अक्षरश: षटकारांचे वादळ पहायला मिळाले. युवराज सिंगप्रमाणे एका फलंदाजाने 6 चेंडूत 6 षटकार ठोकले. हा पराक्रम दक्षिण दिल्लीचा युवा सलामीवीर फलंदाज प्रियांश आर्यने केला आहे. 23 वर्षीय प्रियांश आर्य सलामीवीर म्हणून फलंदाजीला आला आणि त्याने स्फोटक शैली दाखवली. ज्यामुळे सगळेच थक्क झाले.
दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत शनिवारी असाच कारनामा पाहायला मिळाला. या स्पर्धेतील 23 वा सामना दक्षिण दिल्ली सुपर स्टार्स आणि उत्तर दिल्ली यांच्यात पार पडला. या सामन्यात दक्षिण दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना टी20 क्रिकेटमध्ये 300 धावांचा पल्ला गाठत नवा विक्रम केला आहे. 23 वर्षांचा सलामीवीर प्रियांश आर्यने या सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सहा चेंडूत सहा षटकार मारत आपल्या खेळीने लक्ष वेधून घेतले. डावखुरा फलंदाज प्रियांश आर्य सुरुवातीपासूनच आक्रमक दिसत होता, पण 12 व्या षटकात त्याने 6 चेंडूत 6 षटकार मारत खळबळ उडवून दिली. उत्तर दिल्लीकडून गोलंदाजी करणाऱ्या मनन भारद्वाजच्या गोलंदाजीवर त्याने ही कामगिरी केली. या सामन्यात प्रियांशने 50 चेंडूत 120 धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याने 10 चौकार आणि 10 षटकार मारले. तसेच आयुष बडोनीसोबत दुसऱ्या गड्यासाठी 286 धावांची भागीदारी केली. या लीगमधील सर्वात मोठी भागीदारी आहे.
आयुष बदोनीचेही तुफान, 19 षटकारासह ठोकल्या 165 धावा
दिल्ली प्रीमियर लीगमध्ये शनिवारी इतिहास घडला. दक्षिण दिल्लीने उत्तर दिल्ली स्ट्रायकर्सच्या धुलाई करत 20 षटकात तब्बल 308 धावांचा पाऊस पाडला. फ्रँचायझी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा हा विक्रम आहे. दक्षिण दिल्लीचा कर्णधार आयुष बदोनीने वादळी फलंदाजी करताना 19 षटकारांचा पाऊस पाडला. त्याने 300 च्या स्ट्राईक रेटने 165 धावा ठोकल्या. त्याने 55 चेंडूत 8 चौकार व 19 षटकारासह 165 धावांची वादळी खेळी केली. तो ख्रिस गेलच्या टी 20 क्रिकेटमधील 175 च्या सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येपासून केवळ 10 धावांनी मागे राहिला. विशेष म्हणजे, बदोनीने टी 20 क्रिकेटमधील कोणत्याही फ्रँचायजी लीगमध्ये भारतीय म्हणून सर्वात मोठी खेळी खेळली आहे. ख्रिस गेल (175 आरसीबी विरुद्ध पुणे वॉरियर्स) आणि अॅरॉन फिंच (172 ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे) नंतर ही तिसरी सर्वोत्तम खेळी आहे.
या सामन्यात प्रियांश आर्य व आयुष बदोनीच्या शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण दिल्ली संघाने 5 विकेट गमावून 308 धावा केल्या. उत्तर दिल्लीला विजयासाठी 309 धावांचे लक्ष्य मिळाले. उत्तर दिल्लीला 8 बाद 196 धावापर्यंत मजल मारता आली व त्यांनी हा सामना गमावला.
31 षटकार, 308 धावा, टी 20 मधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या
प्रियांश आर्य व आयुष बदोनी या दोन युवा फलंदाजांनी शनिवारचा दिवस गाजवला. प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण दिल्ली संघाकडून 31 षटकार व 19 चौकार लगावले गेले व 20 षटकांत त्यांनी 308 धावांचा डोंगर उभा केला. विशेष म्हणजे, टी 20 क्रिकेटमधील ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. प्रियांशने 50 चेंडूत 120 तर आयुषने 55 चेंडूत 165 धावा फटकावल्या. या दोघांनी 286 धावांची भागीदारी साकारली. दक्षिण दिल्लीच्या या धावसंख्येने आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबादचा 287 धावांचा विक्रम मोडला गेला.
टी 20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या
नेपाळ – 314 धावा वि मंगोलिया, 2023
दक्षिण दिल्ली – 308 धावा वि उत्तर दिल्ली, 2024
सनरायजर्स हैदराबाद – 287 धावा वि आरसीबी, 2024.