सर्व मृत एकाच कुटुंबातील, तीन महिलांचा समावेश : दोन कुटुंबांमध्ये 10 वर्षांपासून होते वैर
वृत्तसंस्था / मुरैना, मध्यप्रदेश
मुरैना येथील लेपा भिडोसा गावात शुक्रवारी सकाळी एकाच कुटुंबातील सहा जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गावातील दोन कुटुंबांमध्ये गेल्या 10 वर्षांपासून असलेल्या वादाचे पर्यावसान हत्यांमध्ये झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबावर केलेल्या गोळीबारात 3 पुरुष आणि 3 महिलांचा मृत्यू झाला. तसेच अन्य 3 जण जखमी झाले आहेत.
मुरैना येथील या हत्याकांडाचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये हल्लेखोर लोकांना काठीने मारहाण करताना दिसत आहेत. तसेच काही लोक बंदुका आणि लाठ्या घेऊन रस्त्यावर उभे आहेत. याचदरम्यान तऊणाकडून बेछूट गोळीबार झाल्यानंतर बरेचजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसत आहेत. गोळीबारानंतर जवळपास आठ-नऊ जण जमिनीवर पडलेले दिसत आहेत. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
लेपा भिडोसा गावातील गजेंद्रसिंग तोमर आणि धीरसिंह तोमर यांच्यात जमिनीवरून वाद होता. 2013 मध्ये गजेंद्र सिंह तोमर यांच्या कुटुंबीयांवर धीरसिंह तोमर यांच्या कुटुंबातील दोन जणांची हत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी खटला सुरू आहे. गजेंद्र सिंह यांनी नुकसानभरपाई म्हणून 6 लाख रुपयेही दिले होते, मात्र पैसे घेऊनही धीरसिंह यांच्या कुटुंबीयांनी खटला मागे घेतला नसल्याचे बोलले जात आहे. या वादातूनच हा गोळीबार व हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे.
माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मुरैना गोळीबाराच्या घटनेबाबत सरकारवर हल्लाबोल केला आहे. ही घटना राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेला मोठे आव्हान आहे. एकामागून एक अशा घटना घडत आहेत, पण सरकारला परिस्थिती नियंत्रणात आणता येत नाही. याप्रकरणी संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालावे असे कमलनाथ यांनी म्हटले आहे.









