चालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑटोरिक्षासह दोघांना धडक
बेंगळूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसने सहा जणांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना मंगळूर जिल्ह्याच्या उळ्ळाल तालुक्यातील तलपाडी टोल गेटजवळ गुरुवारी दुपारी घडली. बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. कासरगोडवरून मंगळूरला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रिव्हर्स येऊन रस्त्यालगत प्रवासी वाहनांची प्रतीक्षा करणाऱ्या दोघांसह ऑटोरिक्षाला धडकली. दुपारी 1:45 च्या सुमारास हा अपघातात घडला. यात सहाजण ठार झाले. मृतांमध्ये बालकासह तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेसंबंधी केएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक अक्रम पाशा यांनी माहिती प्र्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. मंगळूर बस आगार क्र. 1 मधील केए 19 एफ 3407 क्रमांकाची बस दुपारी 12:30 वाजता कासरगोडहून मंगळूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. 1:45 च्या सुमारास तलपाडी टोल गेटपासून 150 मीटर अंतरावर चालकाने बस भरधाव चालविण्याच्या प्रयत्नात ऑटोरिक्षाला धडक दिली. अपघातानंतर बस चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. घटनास्थळी दोघे ठार झाले तर चौघांचा इस्पितळात उपचारावेळी मृत्यू झाला.









