वृत्तसंस्था / पाटणा
सध्या गाजत असलेल्या नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी बिहार पोलिसांनी झारखंडमधून सहा जणांना अटक केली आहे. ही कारवाई झारखंडच्या देवघर जिल्ह्यात शनिवारी करण्यात आली. देवघरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान शाखेच्या नजीक असणाऱ्या एका घरातून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती झारखंड पोलिसांनी दिली आहे. आरोपींनी फुटलेल्या प्रश्नपत्रिकेची विक्री करण्यात सहाय्य केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बिहार पोलिसांनी यांसंबंधी सूचना दिल्यानंतर झारखंड पोलिसांनी धडक कारवाई करुन संशयितांना ताब्यात घेतले.
परमजीतसिंग बिट्टू, बलदेवकुमार चिंटू, प्रशांत कुमार काजू, अजित कुमार आणि राजीव कुमार कारु हे पाच संशयित नालंदा जिल्ह्यातील असून पंकू कुमार यालाही अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर उपस्थित करण्यात येणार असून पोलीस त्यांची कोठडी घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांना शनिवारी रात्री बिहारची राजधानी पाटणा येथे आणण्यात आले आहे. नीट-युजी परीक्षा 5 मे या दिवशी घेण्यात आली होती आणि 4 जूनला परिणाम घोषित झाला होता.









