वृत्तसंस्था/ चेन्नई
2026 पर्यंत निस्सान 6 नव्या कार्सचे लाँचिंग करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी निस्सान यांनी आगामी काळासाठी आपल्या नव्या कार्सच्या लॉन्चिंगची योजना तयार केली आहे. याअंतर्गत 6 नव्या कार्स 2026 पर्यंत सादर केल्या जाणार आहेत.
मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एसयूव्ही गटातील कार्सचे प्रदर्शन जागतिक पातळीवर कंपनीने केले होते. त्याच कार्सचे लाँचिंग आगामी काळात भारतामध्ये होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
अडथळ्याची वाट बिकट
गेल्या बऱ्याच काळापासून निस्सानला भारतीय बाजारामध्ये उतरण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. सनी, मायक्रा आणि टेरानो यासारख्या कार्सना भारतीय बाजारामध्ये म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. इमिशन संदर्भातील कडक नियमावलीमुळे कंपनीला या वाहनांच्या सादरीकरणासाठी अडथळे आले आहेत. 2021 मध्ये लाँच केलेल्या मॅग्नाइट या गाडीला ग्राहकांनी काहीसाच प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. गो, रेडी गो आणि गो प्लस यासारख्या कार्सनाही ग्राहकांचा कमी प्रतिसाद लाभला होता.
होंडाच्या 5 एसयुव्ही कार्स
दुसरीकडे कार उत्पादक कंपनी होंडा या कंपनीनेसुद्धा 2030 पर्यंत भारतात 5 एसयुव्ही गटातील कार्स लॉन्च करण्याचे निश्चित केले आहे. जपानमधील होंडा मोटर कंपनीने आपली नवी कार एलिव्हेट हिचे नुकतेच सादरीकरण केले होते. यायोगे मध्यम आकाराच्या एसयूव्ही गटामध्ये होंडा कंपनीने प्रवेश मिळवला आहे. सदरील नव्या गाडीची किंमत 10 लाख 99 हजार ते 15 लाख रुपये (एक्सशोरूम, दिल्ली) इतकी असणार असल्याचे सांगितले जात आहे. 2030 पर्यंत कंपनी भारतामध्ये एसयुव्ही गटामध्ये 5 नव्या गाड्या लॉन्च करू शकते. अलीकडे सादर केलेल्या एलिव्हेट या गाडीची स्पर्धा हुंडाई क्रेटा, मारुती सुझुकी ग्रँड विटारा, किया सेल्टॉस आणि टोयोटा अर्बन क्रुझर, हायरायडर यांच्याबरोबर होणार आहे.
अशी असेल योजना
निस्साने मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एसयुव्ही गटात तीन कार्सचे सादरीकरण केले होते. निस्सान आणि रेनो यांनी भागीदारी केली असून आगामी काळामध्ये भारतामध्ये नव्या मॉडेलचे सादरीकरण संयुक्त माध्यमातून केले जाणार असल्याचे सांगण्यात येते. नव्या धोरणाअंतर्गत 5300 कोटी रुपयांची गुंतवणूकही केली जाणार असल्याची माहिती आहे. या अंतर्गत 2025 ते 2026 या कालावधीपर्यंत 6 नव्या कार्स भारतीय बाजारामध्ये उतरवण्याची योजना कंपनीने बनवली आहे.









