दोन महिलांचा समावेश : मोठा शस्त्रसाठा जप्त : नक्षलवाद्यांकडून जप्त करण्यात आलेली शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा
वृत्तसंस्था /रायपूर
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र झाली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत जवानांनी 9 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. छत्तीसगड पोलिसांनंतर आता तेलंगणा पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान सुरू केले आहे. याचदरम्यान गुरुवारी सकाळी छत्तीसगडच्या विजापूर सीमेला लागून असलेल्या तेलंगणातील गुंडाला करकागुडेमच्या निलाद्री वनक्षेत्रातील झारागुट्टा गावाजवळ ग्रेहाऊंड्स फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ग्रेहाऊंड फोर्सने दोन महिला नक्षलवाद्यांसह 6 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या चकमकीत दोन जवानांना गोळी लागल्यामुळे ते जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत भद्राद्री कोठागुडेम-अल्लुरी सीतारामाराजू विभागीय समितीचे (बीकेएएसआर डीव्हीसी) 6 माओवादी पॅडर मारले गेले आहेत. गुरुवारी सकाळी 06.45 च्या सुमारास भद्राद्री-कोथागुडेम जिह्यातील कर्कागुडेम पोलीस स्थानकापासून वायव्येस 5 किमी अंतरावर असलेल्या मोथे गावच्या जंगल परिसरात नियमित गस्त सुरू असताना पोलीस दल आणि नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार झाला. नक्षलवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला. त्यानंतर नक्षलवाद्यांचा गोळीबार थांबल्यानंतर जवानांनी परिसरात तपासमोहीम हाती घेतली. यावेळी घटनास्थळावरून ऑलिव्ह हिरव्या रंगाचे कपडे घातलेले 6 मृतदेह सापडले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळावरून 2 एके-47, एक एसएलआर, एक 303 रायफल, एक पिस्तूल आणि मॅगझिन, जिवंत राउंड, किट बॅग आणि इतर साहित्य जप्त केले आहे. या चकमकीत दोन ग्रेहाऊंड सैनिक जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर तेलंगणातील मुल्गु जिल्हा ऊग्णालयात उपचार सुरू आहेत.









