वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी पुण्यातील चाकण येथील आपल्या कारखान्यातून जवळपास 6 लाख कार्सची विक्रमी निर्यात केली असल्याची माहिती आहे. हा यशस्वी टप्पा कंपनीने नुकताच प्राप्त केला आहे.
सदरची वरील कंपनी ही जर्मनीतील ऑटोमोबाईल निर्माती कंपनी फोक्सवॅगन समूहाची सहकारी कंपनी मानली जाते. या कंपनीअंतर्गत स्कोडा, फोक्सवॅगन, ऑडी, पोर्श्चे आणि लंबोर्गिनी यासारख्या कारची विक्री होते.
मेक्सिको, गल्फ देश, उत्तर आफ्रिका आणि इतर आशियाई देशांच्या बाजारपेठांमध्ये भारतीय उत्पादित कार्सना मागणी चांगली नोंदवली जात आहे. भारतातून तयार करण्यात आलेल्या कार्सच्या निर्यातीची संख्या 6 लाखावर पोहोचली असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. सदरचे उद्दिष्ट हे कंपनीने रितसर नियोजनाने साध्य केले असल्याचे कंपनीचे सीइओ पियुष अरोरा यांनी म्हटले आहे. अभियांत्रिकी क्षमता आणि योग्य ती ध्येयधोरणे निर्यातवाढीसाठी सहाय्यभूत ठरली आहेत. पोलो आणि वेंटो या दोन गाड्यांच्या निर्यातीला कंपनीने 2011 मध्ये सुरुवात केली होती.
कुशाक, स्लावियाची निर्यात 2024 पासून
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कुशाक आणि स्लाविया या गाड्यांची निर्यातदेखील चाकण येथील कारखान्यामधून 2024 पासून केली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. 16 हजार चौ.मीटर क्षेत्रफळाच्या जागेत चाकणमध्ये कारखान्याची उभारणी करण्यात येत आहे. त्यातून उत्पादनाचे लक्ष गाठण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.









