किंडरगार्टनमध्ये हल्ला : मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनच्या गुआंग्डोंग प्रांतात एका किंडरगार्टनमध्ये चाकूने हल्ला करत तीन मुलांसमवेत सहा जणांची सोमवारी सकाळी हत्या करण्यात आली आहे. लियानजियांग शहरात वू असे आडनाव असलेल्या एका 25 वर्षीय इसमाला पोलिसांनी याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अन्य मृतांमध्ये एक शिक्षक अन् दोन पालक सामील असल्याची माहिती एका स्थानिक अधिकाऱ्याने दिली आहे. या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. हा हल्ला सोमवार स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 7.40 वाजता झाला आहे.
पोलिसांनी हल्लेखोराला 8 वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. किंडरगार्टन नजीकच्या परिसरात हल्ल्यानंतर प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. चीनमध्ये सामूहिक हत्येच्या घटना इतर देशांच्या तुलनेत कमी घडतात. परंतु अलिकडच्या वर्षांमध्ये देशात चाकूहल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. यातील अनेक घटना या शाळांमध्ये घडल्या आहेत.
मागील वर्षी ऑगस्टमध्ये एका हल्लेखोराने चाकूने जियांग्शी प्रांतातील एका किंडरगार्टनमध्ये हल्ला केल होता. या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी झाले होते. एप्रिल 2021 मध्ये बेइलिउ शहरात चाकू हल्ल्यात दोन मुलांना जीव गमवावा लागला होता. तर 16 जण जखमी झाले होते. ऑक्टोबर 2018 मध्ये दक्षिण-पश्चिम चीननच्या चोंगकिंगमध्ये एका किंडरगार्टनमध्ये चाकूने करण्यात आलेल्या हल्ल्यात 14 मुले जखमी झाली होती.









