वृत्तसंस्था / विरुधुनगर
तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील सत्तूर येथील एका फटाके कारखान्यात स्फोट झाल्याने 6 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. स्फोटके बनविण्यासाठी रासायनिक पदार्थांचे मिश्रण करीत असताना हा स्फोट झाला, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या घटनेच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.
या कारखान्याची प्रमाणपत्रे वैध आहेत की नाहीत, याचीही चौकशी केली जात आहे. स्थानिक नागरीकांच्या म्हणण्यानुसार येथे अवैधरित्या फटाक्यांची निर्मिती केली जात होती. मात्र, कारखान्याच्या व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार हा कारखाना वैध असून फटाकेनिर्मितीचे अनुमतीपत्र व्यवस्थापनाकडे आहे. ही घटना हा केवळ एक अपघात असल्याचे प्रतिपादन कारखान्याकडून करण्यात आले आहे.









