आपल्या देशात एक अजस्त्र रेल्वेगाडी आहे. तिला 6 इंजिने आहेत, असे म्हटल्यास आपला विश्वास बसणार नाही. पण या गाडीला 295 डबे आहेत. म्हणून इतकी इंजिने लागतातच. आपल्या देशात रेल्वेचे फार विस्तृत असे जाळे आहे. प्रतिदिन दशलक्षावधी लोक रेल्वेतून प्रवास करत असतात. अलिकडच्या काळात रेल्वेचा प्रवास वाढल्याने रेल्वेगाड्यांची लांबीही वाढत आहे.

ही रेल्वेगाडी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब रेल्वे असल्याचे मानले जाते. पहिल्या क्रमांकाची सर्वात लांब गाडी रशियात आहे. आपल्या या गाडीचे नाव ‘सुपर वासुकी’ असे आहे. या गाडीचा शुभारंभ आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त करण्यात आला. या गाडीची लांबी साडेतीन किलोमीटर असून तिचे डबे मोजयचे असतील तर पूर्ण 1 तास लागतो. अर्थातच, ही प्रवासी गाडी नसून मालगाडी आहे. काहीवेळा तिला काही प्रवासी डबेही जोडले जातात, ज्यांमधून प्रामुख्याने रेल्वेचे अधिकारी किंवा कर्मचारी प्रवास करतात.
तिच्या 295 डब्यांमध्ये एकंदर 27 हजार टन कोळसा मावतो. तो घेऊन ही गाडीं छत्तीसगडच्या कोरबा स्थानकातून निघते आणि नागपूरच्या राजनंदगाव पर्यंत प्रवास करते. हे अंतर पार करण्यासाठी तिला 11 तास 20 मिनीटे लागतात. कोळशाची घाऊक वाहतूक करण्यासाठी तिची निर्मिती करण्यात आली आहे.









