बिहार, उत्तर प्रदेशसह दिल्लीत ईडीची कारवाई
► वृत्तसंस्था/ पाटणा
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा झटका बसला आहे. ईडीने सोमवारी लालूप्रसाद यांच्या कुटुंबीयांची मालमत्ता जप्त केली. यामध्ये गाझियाबाद, पाटणा, महुआबाग, दानापूर येथील मालमत्तांचा समावेश आहे. याशिवाय ईडीने लालू यादव यांची मुलगी हेमा यादव यांची उत्तर प्रदेशमधील संपत्ती जप्त केली आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशसोबतच तेजस्वी यादव यांची दिल्लीतील ‘डी ब्लॉक’ मालमत्ताही जप्त केली.
अंमलबजावणी संचालनालयाने लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांची मालमत्ता तिसऱ्यांदा जप्त केली आहे. यावेळी त्याच्या गाझियाबाद आणि बिहारमधील मालमत्तांचाही समावेश आहे. जमिनीच्या बदल्यात नोकऱ्या देण्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने लालू कुटुंबावर ताशेरे ओढले असल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीने बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालू यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांची दिल्लीस्थित ‘डी ब्लॉक’ मालमत्ताही जप्त केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या एकंदर संपत्तीची किंमत 6 कोटी 2 लाख ऊपये असली तरी बाजारभाव यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचे सांगण्यात आले.
यापूर्वी 10 मार्च 2023 रोजी ईडीने लालू यादव यांच्या 15 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले होते. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांच्या घरांचीही झडती घेण्यात आली. दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीतील तेजस्वी यादव यांच्या बंगल्यावर ईडीने छापा टाकला. त्यावेळी तेजस्वी यादव आणि त्यांचा पक्ष आरजेडीने अनेक आरोप केले होते.









