जम्मू / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील जम्मू विभागातील नरवाल भागात झालेल्या 2 स्फोटांमध्ये सहा नागरीक जखमी झाले असून ही घटना शनिवारी सकाळी 10.45 वाजता घडली आहे. जखमींवर उपचार केले जात असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हे स्फोट एका घराच्या अंगणात घडल्याचे सांगण्यात आले. दोन्ही स्फोट एकापाठोपाठ झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
स्फोटांच्या ठिकाणाजवळ वाहने थांबविण्यात आली होती. हे ठिकाण आता सील करण्यात आले असून परिसराची झडती घेण्यात येत आहे. राहुल गांधी यांची पदयात्रा या भागात येण्याआधी दोन दिवस हे स्फोट झाल्याने यात्रेची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात येणार आहे. 23 जानेवारीला गांधी येथे एका सभेत भाषण करणार आहेत. स्फोटांची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही.









