नौदल प्रमुख हरि कुमारांनी दिली माहिती ः ड्रोन अन् पाणबुडीद्वारे ठेवली जातेय नजर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीन सातत्याने हिंदी महासागरातील स्वतःची उपस्थिती वाढवत असल्याने भारतीय नौदल चिनी युद्धनौकांवर करडी नजर ठेवून आहे. चीन नौदलाच्या युद्धनौका पाकिस्तानसमवेत अनेक देशांच्या बंदरानजीक आहेत आणि भारतीय नौदल त्यांच्या हालचालींवर पूर्ण नजर ठेवून असल्याचे उद्गार नौदलप्रमुख ऍडमिरल हरि कुमार यांनी चाणक्य डायलॉगदरम्यान काढले आहेत.
एकावेळी हिंदी महासागरात चीनच्या सुमारे 3-6 युद्धनौका असतात. यातील काही युद्धनौका ओमानच्या आखातानजीक तर काही महासागराच्या पूर्व दिशेने असतात. याचबरोबर काही चिनी संशोधन नौका तसच मासेमारी पकडणाऱया नौकाही या क्षेत्रात आहेत. आम्ही आमच्या रणनीतीत बदल करत असतो. यामुळे आमच्या क्षमतेच्या विकासात देखील मदत मिळते असे नौदलप्रमुखांकडून सांगण्यात आले.
पाकिस्तानी नौदलात नव्या युद्धनौकांची भर
सद्यस्थिती पाहता संघर्षाचा धोका कमी आहे, परंतु तरीही आम्ही युद्धाची भीती नाकारू शकत नाही. पाकिस्तानी नौदल अत्यंत वेगाने विकसित होत असून स्वतःच्या ताफ्यात सातत्याने नव्या युद्धनौका जोडत आहे. तर चीनने मागील 10 वर्षांमध्ये अनेक युद्धनौका आणि पाणबुडय़ांना सामील केले आहे. याचबरोबर चीन तिसऱया विमानवाहू युद्धनौकेवर काम करत आहे. तसेच चीन अनेक मोठय़ा विध्वंसक युद्धनौका तयार करत असला तरीही त्यांचा नौदलात समावेश होण्यास बराच कालावधी लागणार असल्याचे नौदलप्रमुखांनी म्हटले आहे.
हिंदी महासागरात सतर्क
हिंदी महासागरीय क्षेत्रावर आम्ही पूर्ण नजर ठेवून आहोत. हिंदी महासागरात कोणाची उपस्थीत आहे आणि ते काय करत आहेत हे जाणण्याचा आमचा प्रयत्न आहे. याविषयी आम्ही निरंतर देखरेख ठेवून आहोत तसेच विमाने, ड्रोन, युद्धनौका आणि पाणबुडय़ा तैनात करत आहोत असे नौदल प्रमुख हरि कुमार यांनी सांगितले आहे. चीनच्या संशोधन नौका इलेक्ट्रॉनिक सिग्नल टॅक करू शकतात. याचमुळे या संशोधन नौका भारतानजीकच्या भागात आल्यावर आम्ही त्यांना ट्रक करतो असे ऍडमिरल कुमार यांनी म्हटले आहे.
2047 मध्ये आत्मनिर्भर होणार नौदल
वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी दिल्लीतील ‘द चाणक्य कॉन्क्लेव्ह’मध्sय बोलताना ‘भारतीय वायुदल-भविष्य आता आहे’ विषयावर भूमिका मांडली आहे. भूमीवरील आक्रमण प्लॅटफॉर्मसोबत आमच्याकडे अंतराळ आधारित युद्धप्रणाली देखील असावी यावर आम्हाला काम करावे लागणार असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे. तर भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होईपर्यंत नौदलाला पूर्णपणे आत्मनिर्भर करण्याचे लक्ष्य आहे. 2047 पर्यंत आमचे नौदल फ्लोट, मूव्ह आणि फ्लाइट या तिन्ही प्रकरणांमध्ये 100 टक्के आत्मनिर्भर होणार असल्याचे नौदलप्रमुखांकडून नमूद करण्यात आले.









