छाननी नंतर 5 अर्ज अवैध

प्रतिनिधी /म्हापसा
बार्देश तालुक्यातून पंचायत निवडणुकीच्या छाननीवेळी म्हापसा मामलेदार कचेरीत उमेदवारांनी एकच गर्दी केली. विशेष म्हणजे 33 पंचायतीमधून छाननी नंतर बार्देश निर्वाचन अधिकारी वर्गांनी एकूण 5 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविले. आता 1142 अर्ज राहिले असून आज उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
बार्देश तालुक्यातून छाननी झाल्यावर 6 उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित आहे. त्यात नादोडा पंचायत-मधुरा मधू मांद्रेकर (वॉर्ड 4), परेश गावस (वॉर्ड 3), रामा नानोडकर (वॉर्ड 5). वेरे रेईसमागूस पंचायत- संगीता भोसले (वॉर्ड 9), साल्वादोर द मुंद पंचायत- माजी सरपंच संदीप साळगावकर (वॉर्ड 2), उपसरपंच रिना फर्नांडिस (वॉर्ड 3) यांचा समावेश आहे.
नादोडा पंचायतीच्या वॉर्ड 4 मधून आपला एकमेव अर्ज दाखल झाल्याने आपली बिनविरोध निवड निश्चित असल्याचे मधुरा मांद्रेकर यांनी सांगितले. त्याच पंचायतीमधील परेश गावस व रामा नादोडकर यांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. आता दोन वॉर्डात निवडणूका होणार असून नादोडा पंचायतीमध्ये आपलेच पॅनल निवडून येईल अशी माहिती रामा नादोडकर व परेश गावस यांनी दिली. वेरे रेईसमागूस पंचायतीच्या वॉर्ड 9 मधून संगीता भोसले यांच्याविरोधात अन्य कुणी अर्ज दाखल न केल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
साल्वादोर – मुंद पंचायतीमध्ये नवीन विक्रम
गेल्या पाच वर्षापूर्वी साल्वादोर-द मुंद या पंचायतीमधून संदीप साळगावकर व रिना फर्नांडिस यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. संदीप साळगावकर यांच्याविरुद्ध रोशनी सावईकर यांची सही असलेला अर्ज कुणी दाखल केला. मंगळवारी छाननीवेळी रोशनी सावईकर निर्वाचन अधिकाऱयांसमोर हजर राहून ती आपली सही असली तरी कुणी फसवेगिरी करून आपल्या नावाचा अर्ज मामलेदार कचेरीत दाखल केल्याचे स्पष्ट केले.
कांदोळी पंचायतीमधून ज्योकीम मारिया परेरा यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. कळंगूट पंचायतीचे माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी सादर केलेला दोघां पंचाविरोधचा अर्जही फेटाळला. हणजूण पंचायतीचे माजी पंच पेद्रु मेंडोसा व रवी हरमलकर यांच्याविरोधात रमेश नाईक यांनी आक्षेप घेतला असता निर्वाचन अधिकाऱयांनी तो फेटाळून लावला.









