लॅन्सेटच्या अध्ययनाचा निष्कर्ष ः 2019 मधील आकडेवारी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतात 2019 साली पाच प्रकारच्या जिवाणूंमुळे (ई-कोलाई, एस-न्युमोनिया, के-न्युमोनिया, एस-ऑरियस आणि ए-बाउमानी) सुमारे 6.8 लाख लोकांना जीव गमवावा लागला होता. द लॅन्सेट या नियतकालिकाकडून प्रकाशित एका अध्ययनातून ही बाब समोर आली आहे. सामान्य जिवाणू संक्रमण 2019 मध्ये मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण ठरले होते जागतिक स्तरावर प्रत्येक 8 मृत्यूंपैकी एक मृत्यू जिवाणू संसर्गाशी संबंधित होता असे विश्लेषणात आढळून आले आहे.
2019 मध्ये सामान्य जिवाणू संक्रमणांशी संबंधित 77 लाख मृत्यू झाले, यातील केवळ 5 जिवाणू निम्म्याहून अधिक मृत्यूंशी संबंधित होते असे संशोधकांनी म्हटले आहे. सर्वात घातक जिवाणू रोगजन्य आणि संक्रमणाचा प्रकार स्थान आणि वयानुसार भिन्न असतात. भारतात ई-कोलाई, एस-न्युमोनिया, के-न्युमोनिया, एस-ऑरियस आणि ए-बाउमानी हे सर्वात घातक जिवाणू आढळून आले असून यांच्यामुळे 2019 मध्ये 6,78,846 लोकांना जीव गमवावा लागला असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.

अध्ययनानुसार ई-कोलाई सर्वातक घातक रोगजन्य जिवाणू होता, याच्यामुळे भारतात 2019 मध्ये 1,57,082 लोकांचा मृत्यू ओढवला होता. जागतिक स्तरावर जिवाणू संक्रमण 2019 साली मृत्यूचे प्रमुख कारण म्हणून इस्केमिक हृदयविकारानंतर दुसऱया स्थानावर होते.
अधिक निदान प्रयोगशाळा क्षमतेसह मजबूत आरोग्य प्रणालींची निर्मिती, नियंत्रक उपाययोजना लागू करणे आणि अँटीबायोटिकचा वापर अनुकूलित करण्यात आल्यास जिवाणू संक्रमणामुळे होणाऱया आजारांचा भार कमी करण्यास मदत होऊ शकते असे संशोधकांनी सांगितले आहे.
ही नवी आकडेवारी पहिल्यांदा जिवाणू संक्रमणामुळे निर्माण जागतिक सार्वजनिक आरोग्यासमोरील आव्हानाचे स्वरुप उघड करत असल्याचे उद्गार अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठातील स्कुल ऑफ मेडिसीनचे संचालक आणि अध्ययनाचे सह-लेखक क्रिस्टोफर मुर्रे यांनी काढले आहेत.
या अध्ययनाचे निष्कर्ष जागतिक आरोग्य पुढाकारांच्या रडारसमोर मांडणे अत्यंत आवश्यक आहे. यातून रोगास कारणीभूत घटकांची सखोल विश्लेषण करता येईल आणि बळी तसेच संक्रमितांची संख्या कमी करण्यास योग्य पावले उचलता येणार असल्याचे मुर्रे म्हणाले. 2019 मध्ये एचआयव्हीच्या तुलनेत एस-ऑरियस आणि ई-कोलाईमुळे अधिक मृत्यू झाले आहेत. 204 देश आणि सर्व क्षेत्रांना व्यापणारे हे अध्ययन करण्यात ओल आहे.
ग्लोबल बर्डन ऑफ डिसिज 2019 आणि ग्लोबल रिसर्च ऑन एंटीमायक्रोबियल रेजिस्टेंस (जीआरएएम) अध्ययनांतील आकडेवारी आणि निष्कर्षांच वापर करत संशोधकांनी प्रत्येक जिवाणूशी निगडित मृत्यू आणि जबाबदार संक्रमणाच्या प्रकाराचा अनुमान व्यक्त करण्यासाठी 34.3 कोटी वैयक्तिक नोंदी आणि ‘पॅथोजन आयसोलेट्स’चा वापर केला आहे. जिवाणूंशी संबंधित 77 लाख मृत्यू प्रकरणांपैकी 75 टक्के मृत्यू लोअर रेस्पिरेटरी इंफेक्शन्स (एलआरआय), ब्लडस्ट्रीम इंफेक्शन्स (बीएसआय) आणि पेरिटोनल अँड इंट्रा एब्डोमिनल इंफेक्शन्स (आयएए) मुळे झाले आहेत.









