डिजिटल रेडिओ अँटेना बसविल्याने वाढली उंची
पॅरिसमधील ऐतिहासिक इमारत आयफेल टॉवरची उंची 330 मीटर झाली आहे. मंगळवारी एक नवा डिजिटल रेडिओ अँटेना बसविण्यात आल्याने टॉवरची उंची 6 मीटरने (19.69 फूट) वाढली आहे. अँटेना बसविण्यात आल्यावर टॉवरची उंची 330 मीटर झाली आहे. हे उपकरण हेलिकॉप्टरच्या मदतीने बसविण्यात आले आहे.
आयफेल टॉवर 19 व्या शतकात इंजिनियर गुस्ताव आयफेल यांनी निर्माण केला होता. त्याच्या निर्मितीस 26 जानेवारी 1887 रोजी सुरुवात झाली होती. 300 मजुरांनी मिळून आयफेल टॉवर 2 वर्षे, 2 महिने आणि 5 दिवसांमध्ये पूर्ण केली होती. याचे उद्घाटन 31 मार्च 1889 मध्ये झाली आणि 6 मेपासून हा टॉवर लोकांसाठी खुला करण्यात आला.

प्रारंभी आयफेल टॉवर केवळ 20 वर्षांपर्यंत ठेवण्याची योजना होती. 1909 मध्ये तो नष्ट करण्यात येणार होता. परंतु या 20 वर्षांदरम्यान या टॉवरने मोठय़ा प्रमाणात पर्यटकांना आकर्षित केले आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही याला उपयुक्त मानण्यात आल्यावर तो पाडविण्याऐवजी जागतिक वारसा म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून दरवर्षी सुमारे 65-70 लाख पर्यटक आयफेल टॉवरला भेट देत असतात. 1960 च्या दशकापासून मास टूरिझमचा विकास झाल्यावर पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. दर रात्री काळोख पडल्यावर 1 वाजेपर्यंत (उन्हाळय़ात 2 वाजेपर्यंत) आयफेल टॉवर उजळून निघतो.









