निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन ः निर्यात करण्यास तयार
नवी दिल्ली, वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
भारतात नुकतेच उपयोगात आणण्यास प्रारंभ केले गेलेले ‘5 जी’ तंत्रज्ञान हे पूर्णतः भारतनिर्मित आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. हे तंत्रज्ञान विकसित करताना काही महत्त्वाचे साहाय्य दक्षिण कोरिया या देशाकडून घेण्यात आले आहे. मात्र, तंत्रज्ञानाचा विकास भारतातच करण्यात आला असून ते स्वदेशी तंत्रज्ञान आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
5 जी सेवा भारतात काही दिवसांपूर्वी काही महत्त्वाच्या शहरांमध्ये देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने हे घडले आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या आत्मनिर्भरता मंत्राचे ते यश आहे. या तंत्रज्ञानाचा स्वदेशात विकास केल्याने भारत जगातील काही निवडक देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. ही माहिती त्यांनी अमेरिकेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिली.
अमेरिकेच्या दौऱयावर
निर्मला सीतारामन सध्या अमेरिकेच्या दौऱयावर असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी त्या अमेरिकेला गेल्या आहेत. शुक्रवारी त्यांनी जॉन हॉपकिन्स स्कूल ऑफ ऍडव्हान्स इंटरनॅशनल स्टडीज (एनएआयएस) च्या विद्यार्थ्यांशी हितगूज केले. त्यावेळी त्यांनी भारतनिर्मित 5 जी तंत्रज्ञानासंबंधी या विद्यार्थ्यांना माहिती दिली. या तंत्रज्ञानाचा विकास केल्याने भारताची मान जगात उंचावली आहे, असे प्रतिपादन त्यांनी अभिमानाने केले.
काही कंपन्यांकडून 5 जी सेवा
सध्या देशातील 4 शहरांमध्ये रिलायन्स जिओ ही कंपनी 5 जी सेवा उपलब्ध करीत आहे. एअरटेल या अन्य दूरसंचार कंपनीनेही 8 शहरांमध्ये ही सेवा देण्यास प्रारंभ केला आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी या चार शहरांमध्ये जिओची 5 जी सेवा उपलब्ध आहे. तर दिल्ली, मुंबई, हैदराबाद, सिलिगुडी, वाराणसी, बेंगळूर, चेन्नई आणि नागपूर या आठ शहरांमध्ये एअरटेलच्या 5 जी सेवेची चाचणी होत आहे. जिओने डिसेंबर 2003 पर्यंत तर एअरटेलने 2024 पर्यंत साऱया देशात ही सेवा पोहचविण्याचे आश्वासन दिले आहे.
5 जीमुळे अनेक सुधारणा
ड इंटरनेट सेवा कोणत्याही अडथळय़ाविना वेगवान केली जाणार
ड इंटरनेट फोन सेवेत सुधारणा, आवाज अधिक चांगला होणार
ड आरोग्य आणि शैक्षणिक सेवा देशभरात पुरविणे सोपे होणार
ड शेतीच्या कामांमध्येही उपयुक्त, शेताचे संरक्षण करता येणार
ड शेतीचे संरक्षण आणि इतर कामांसाठी ड्रोनचा उपयोग शक्य
ड चालकविरहित वाहने चालविणे अधिक सहज-सोपे होणार
ड यंत्रमानवाच्या साहाय्याने उत्पादन व इतर कामे सुलभ होणार
ड सरकारी प्रशासन आणि व्यवस्थापनालाही गतीमानता येणे शक्य
ड दुर्गम भागांमध्ये औषधे आणि इतर साधने पोहचविता येणार
ड खेडय़ापाडय़ांमधील रुग्णांनाही दूरच्या डॉक्टरांशी संपर्क सोपा









