गोवा खंडपीठाचा आदेश : मोरंबी ओ ग्रँड टेनंट असोसिएशन घोटाळा प्रकरण
पणजी : मेरशी जवळील मोरोंबी-ओ ग्रँड टेनंट असोसिएशनकडून 59,22,500 रुपये वर्षभरात वसूल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बुधवारी दिले आहेत. अगोदरच्या व्यवस्थापकीय समितीकडून हे पैसे वसूल करण्यात यावे, असे आदेशात म्हटले आहे. मोरोंबी-ओ-ग्रँड टेनेंट असोसिएशनच्या माजी कार्यकारिणीने बराच मोठा आर्थिक घोटाळा केलेला होता. यासंदर्भात ऑडिटर्सनी त्यावर आपल्या वार्षिक अहवालात ताशेरे ओढले होते. ऑडिटर्सनी म्हटल्यानुसार हा घोटाळा तब्बल 59 लाख रुपयांचा आहे. ऑडिटर्सनी 23 ऑगस्ट 2022 रोजी जो आपला अहवाल सादर केला होता, त्यात त्यांनी मोरोंबी-ओ-ग्रँड संघटनेच्या आर्थिक व्यवहाराबाबत संशय व्यक्त केला होता. मामलेदारांकडे तक्रारी केल्यानंतर मामलेदारांनी फार गांभीर्याने हे प्रकरण घेतले नसल्याने काहीजणांनी त्यास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच या प्रकरणात पोलीस स्थानकातही तक्रार नोंदवली होती. बुधवारी या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने तिसवाडी मामलेदारांना मोरोंबी-ओ-ग्रँडच्या मागील समितीकडून 59 लाख 22 हजार 500 रुपये वसूल करावे व ज्यांनी आव्हान दिले होते, त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात यावे, असे आदेश दिले. तसेच मामलेदारांच्या कारभारावरही न्यायालयाने ताशेरे ओढले.









