3 तासांत नष्ट झाली ‘रॉन्देवू ः तेलगळतीची भीती व्यक्त
वृत्तसंस्था/ लंडन
लंडनच्या डेवन बंदरावर सुपरयॉट ‘रॉन्देवू’मध्ये आग लागली आहे. या आगीत ही सुपरयॉट पूर्णपणे जळून खाक झाली आहे. आग लागण्यामागील कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुपरयॉटला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने त्वरित तेथे धाव घेतली होती. अग्निशमन दलाची 10 वाहने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत होती, परंतु 3 तासांमध्ये सुपरयॉट पूर्णपणे जळून गेली आहे.
सुपरयॉटच्या टँकमध्ये भरलेले इंधन या आगीचे कारण असू शकते असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱयाने म्हटले आहे. या सुपरयॉटमधून अटलांटिक समुद्रात काही प्रमाणात तेलगळती होण्याची भीती व्यक्त होत आहे.
अद्याप या सुपरयॉटच्या मालकाचा थांगपत्ता लागू शकलेला नाही. ही सुपरयॉट एखाद्या रशियन अब्जाधीशाची असू शकते अशी चर्चा आहे. आग लागल्याची घटना प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होऊनही याचा मालक समोर आलेला नाही.









