दोन दिवसांत रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार : जिल्ह्यात 8.29 लाख लाभार्थी
बेळगाव : अन्नभाग्य योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अतिरिक्त तांदळाच्या बदल्यात दरमहा रोख रक्कम दिली जाणार आहे. एका बेळगाव जिल्ह्यात दरमहा अंदाजे 50 कोटीहून अधिक रक्कम लागणार आहे. जुलैच्या पहिल्या महिन्यात जिल्ह्यातील 8.29 लाख कार्डधारकांना 46 कोटीहून अधिक रक्कम वितरित केली जाणार आहे. येत्या दोन दिवसांत रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे.
जिल्ह्यात 11 लाख 49 हजार 516 इतकी लाभार्थ्यांची संख्या आहे. त्यापैकी 1 लाखाहून अधिक लाभार्थ्यांची बँक खाती निष्क्रिय आहेत. त्यामुळे या योजनेत अडचणी येऊ लागल्या आहेत. बीपीएल कार्डधारकांना पाच किलो तांदूळ वितरित केले जात आहेत. त्यासाठी दरमहा 20 हजार मेट्रिक टन तांदळाचा साठा लागत आहे. मात्र पुढील महिन्यापासून माणसी दहा किलो तांदळाचा पुरवठा करावयाचा असल्यास दरमहा 40 हजार मेट्रीक टन तांदळाची गरज भासणार आहे. मात्र तेवढा तांदूळसाठा उपलब्ध नसल्याने जुलै महिन्यात तांदळाऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना जुलैमध्ये पाच किलो तांदळाबरोबरच रोख रक्कमही मिळणार आहे.
अन्नभाग्य योजनेसाठी दरमहा 58 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. जुलै महिन्यासाठी 46 कोटी रुपये अनुदान उपलब्ध झाले आहे. येत्या दोन दिवसांत लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. मात्र 1 लाख 20 हजार लाभार्थ्यांची बँक खाती बंद आहेत. अशा लाभार्थ्यांची यादी रेशन दुकानदारांकडे उपलब्ध आहे. लाभार्थ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून ई-केवायसी करून घ्यावी आणि बँक खाते सुरळीत सुरू करावे, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा खात्याने केले आहे.
बँक खात्याला आधारकार्ड लिंक करा
ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते निष्क्रिय आहे, असे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नयेत यासाठी बँक खात्याला आधारकार्ड लिंक करावे. याबाबत बँक आणि पोस्ट ऑफिसमध्येदेखील सूचना करण्यात आल्या आहेत. येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील लाभार्थ्यांची रक्कम जमा केली जाणार आहे.
– श्रीशैल कंकणवाडी (सहसंचालक अन्न व नागरी पुरवठा खाते)









