रशियाचा युक्रेनवर वर्षातील सर्वात मोठा हल्ला
वृत्तसंस्था/कीव, मॉस्को
युक्रेनशी युद्धबंदीसाठी पाश्चात्य देशांकडून प्रयत्न सुरू असतानाच रशियाने युक्रेनवर या वर्षीचा सर्वात मोठा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला आहे. रशियन सैन्याने आपल्या हद्दीत 574 ड्रोन आणि 40 क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. देशाच्या पश्चिमेकडील भागांना लक्ष्य करून बहुतेक हल्ले केल्याचे युक्रेनियन हवाई दलाने म्हटले आहे. या हल्ल्यांमध्ये किमान एक व्यक्ती ठार झाला आणि 15 जण जखमी झाले. तसेच युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्रेई सिबिहा यांनीही या हल्ल्यांबाबत एक निवेदन जारी केले. रशियाने पश्चिम युक्रेनमधील एका प्रमुख अमेरिकन इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनीवर हल्ला केल्याचे त्यांनी जाहीर केले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह पाश्चात्य देश रशिया-युक्रेन संघर्ष थांबवण्याचा प्रयत्न करत असताना रशियाने हा हल्ला केला आहे. गेल्या आठवड्यात अलास्कामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतल्यानंतर ट्रम्प यांनी सोमवारी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांसोबत बैठक केली. या बैठकीत ट्रम्प यांनी कोणत्याही प्रकारची युद्धबंदी लागू करण्याऐवजी थेट शांतता करारावर विचार करण्याचा आग्रह धरला. तथापि, या काळात त्यांनी आणि युरोपियन नेत्यांनी शांतता कराराच्या बदल्यात भविष्यातील धोक्यांना तोंड देण्यासाठी युक्रेनला काही सुरक्षा हमी दिल्या जाऊ शकतात यावर सहमती दर्शविली.









