वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सोमवार संध्याकाळ ते मंगळवार संध्याकाळ या चोवीस तासांमध्ये भारतात कोरोनाचे नवे 573 रुग्ण सापडले असून गेला आठवडाभर ही संख्या स्थिर आहे. परिणामी प्रशासनाला आणि नागरीकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. नव्या रुग्णांमुळे देशभरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,565 झाली आहे.
याच कालावधीत कोरोनामुळे देशभरात दोन मृत्यू झाले असून मृतांपैकी एक कर्नाटकातील तर एक हरियाणातील आहे. डिसेंबरच्या प्रारंभी नव्या रुग्णांची संख्या प्रतिदिन 10 च्याही आत होती. तथापि, डिसेंबरच्या मध्यानंतर सर्वत्र थंडीचे प्रमाण वाढल्याने आणि कोरोनाचे नवे रुप जेएन 1 चा प्रादुर्भाव झाल्याने पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. नागरीकांनी मास्कचा उपयोग सातत्याने करावा आणि कोरोनासंबंधीच्या इतर नियमांचे पालन करावे, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.
आतापर्यंत साडेचार कोटींना लागण
2020 पासून भारतात कोरोनाचे तीन मोठे उद्रेक झाले आहेत. एकंदर साडेचार कोटींहून अधिक लोकांना गेल्या तीन वर्षांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. या कालावधीन या रोगाने मृत झालेल्या लोकांची संख्या 5.3 लाख असल्याची माहिती प्रशासनाने दिली. याच कालावधीत 4.4 कोटी नागरीक बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण रुग्णांच्या संख्येच्या 98.81 टक्के इतके आहे. आतापर्यंत प्रशासनाने देशभरात कोरोना विरोधी लसीच्या 220.67 कोटी मात्रा दिल्या आहेत.









