जलजीवन मिशन योजनेची फलनिष्पत्ती : टंचाई आराखड्यातील एकाही गावात अद्याप पाणी टंचाई नाही,गेल्या दोन वर्षांपासून पाणी टंचाईग्रस्त गावांची संख्या घटतेय
कोल्हापूरः कृष्णात चौगले
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून राबविलेल्या जल जीवन मिशन योजनेमुळे वर्षानुवर्षे पाणीटंचाई आराखड्यात असलेल्या ५७ गावांमध्ये यंदा मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे चालू वर्षाच्या आराखड्यातून ही गावे वजा झाली आहेत. अद्याप जिल्ह्यातील एप्रिल ते जून २०२५ अखेर ९८ वाड्या आणि ६५ गावे अशा एकूण १६३ गावांमध्ये पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने त्यानुसार आराखडा तयार केला आहे. तसेच जानेवारी ते मार्च २०२५ च्या आराखड्यातील संभाव्य ८७ पाणी टंचाईग्रस्त गावांपैकी एकही गावामध्ये पाणीटंचाईची झळ जाणवलेली नाही. आराखड्यातील एकही गावातून अद्याप पाणी टंचाई उपाययोजनांची मागणी केलेली नाही.
जिल्ह्यातील सुमारे २०० गावे आणि वाड्यावस्त्यांमध्ये पाणी टंचाई जाणवायची. पण सन २०२३-२४ अखेरपर्यंत जल जीवन मिशन योजना, सौर ऊर्जा दुहेरी पाणी पुरवठा योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, तसेच इतर अन्य योजनांतर्गत १५० पाणीटंचाईग्रस्त गावांपैकी ५७ गावांमध्ये कायमस्वरूपी पाणी टंचाई निवारण झाले आहे. गेल्या महिनाभरापासून उष्णतेचे प्रमाण वाढले असले तरी अद्याप एकही गावातून पाणी टंचाई उपाययोजनांबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झालेला नाही. साधारणत: २० लीटरपेक्षा कमी पाणी उपलब्ध होत असल्याचे आढळल्यास पाणी टंचाईबाबतच्या उपाययोजना राबविल्या जातात. भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्या भूजल पातळीच्या अहवालानुसार यावर्षीच्या पाणी टंचाई अहवालानुसार कोणत्याही गावांना पाणी टंचाई भासण्याची शक्यता नाही. यामध्ये एप्रिल आणि मे महिन्यात वळीव पाऊस झालाच नाही तर मात्र टंचाईची शक्यता वर्तवली आहे.
सध्या जिल्ह्यातील बहुतांशी गावांमध्ये पाणी पुरवठ्याची सोय उपलब्ध आहे. तरीही शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीला ५५ लिटर पाणी दिले जाणार आहे. त्यानुसार जिह्यातील सुमारे बाराशेहून अधिक गावांमध्ये जलजीवन योजना राबवली जात आहे. पण पाणी पुरवठा योजना असून देखील भौगोलिक व भूजलशास्त्राrय प्रतिकूल परिस्थितीमुळे काही गावे व वाड्यावस्त्यांमध्ये पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे जल स्त्रोत बळकटीकरण, त्याचप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत ग्रामसभा ठरावांबरोबरच गटविकास अधिकारी व तहसिलदार यांच्या संयुक्त तपासणी आधारे हा आराखडा तयार केला आहे. यामध्ये विशेषत: विंधन विहीरीवर (बोअरवेल) जास्त भर दिला आहे. संभाव्य पाणी टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठ्याची सोय उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. जिह्यामध्ये झालेल्या पर्जन्यमानाच्या आधारे व शासनाच्या पाणी टंचाई अनुषंगीक निकषांनुसार कोल्हापूर जिह्यात जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जूनअखेर या कालावधीसाठी पाणी टंचाई निवारण कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार पाणी टंचाईच्या तिव्रतेनुसार आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यकतेनुसार निधी मंजूर केला जाणार आहे.
एप्रिल व मे मध्ये खालावते भूगर्भातील पाणीपातळी
नदीकाठावरील तसेच ज्या गावांना नळपाणीपुरवठा योजना सुरु आहेत, अशा सर्व गावांमध्ये पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरु आहे. पण जी गावे नदीकाठापासून दूर अंतरावर आहेत, तसेच डोंगरातील बहुसंख्य धनगरवाड्यांमध्ये नळपाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठयाची सोय उपलब्ध नाही. या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी विंधन विहीरींचा वापर केला जातो. एप्रिल व मे महिन्यामध्ये भूगर्भातील पाणीपातळी खालावते. त्यामुळे विंधन विहीरीतून पुरेसे पाणी मिळणे कठीण बनते. परिणामी भविष्यात अशा गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवणार आहे.
पाणी टंचाई उपाययोजनांबाबत एकही प्रस्ताव नाही
जिह्यात एप्रिल, मे महिन्यात काहीअंशी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यापार्श्वभूमीवर उपलब्ध असणारा पाणीसाठा जपून वापरावा लागणार आहे. धरणांमध्ये सध्या असणारा पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत जपून वापरणे गरजे आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाण्याच्या नैसर्गिक स्त्राsतांची स्वच्छता निर्जंतुकीकरण, त्यातील पाण्याचा योग्य कारणासाठी वापर होतो की नाही याची माहिती घेतली जात आहे. पाणी टंचाई आराखड्यामध्ये समाविष्ठ असणाऱ्या गावांपैकी एकही गावात अद्याप टंचाईच्या उपाययोजना राबविण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. जल जीवन मिशन योजनेमुळे जिह्यातील 57 गावे टंचाईमुक्त झाली असून ती कायमची पाणीदार बनली आहेत.
अर्जुन गोळे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि. प. कोल्हापूर








