131 जणांनी प्राशन केले होते मद्य ः 15 जणांची प्रकृती गंभीर
वृत्तसंस्था / अहमदाबाद
गुजरातच्या बोटाद जिल्हय़ात विषारी दारूचे प्राशन केल्याने आतापर्यंत 57 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 15 जणांची प्रकृती गंभीर आहे. विषारी दारूचे प्राशन करणाऱयांपैकी 10 जणांचा सोमवारी मृत्यू झाल्यावर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली होती.
मद्य कारखान्यात मेथनॉलचा पुरवठा केला जात होता. हे रसायन अहमदाबादमधून थेट पुरविण्यात येत होते असे मुख्य आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले आहे. या प्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱयांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री वीनू मोरदिया यांनी म्हटले आहे.
विषारी दारूचे प्राशन रविवारी रात्री नभोई गावात जात लोकांनी केले होते. सोमवारी सकाळी या सर्वांना पोटदुखी तसेच उलटय़ांचा त्रास सुरू झाला. या सर्वांना रुग्णालयात हलविण्यात आल्यावर यातील एकेकाचा मृत्यू होण्यास सुरुवात झाल्याचे बोटाद पोलिसांनी म्हटले आहे.
याप्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने पोलीस उपअधीक्षक स्तरीय अधिकाऱयाच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक नेमले आहे. रोजिंद, अणीयाणी, आकरु, चंदरवा आणि उंचडी गावात विषारी दारूने हे बळी घेतले असल्याचे प्रारंभिक तपासात दिसून आले आहे.









