अब्जाधीशामुळे पूर्ण गाव झाले मालामाल
माणसाने यशाचे मोठे टोक गाठल्यावर तो जुन्या सहकाऱ्यांना आठवणीत ठेवण्याच्या घटना क्वचितच घडतात. अनेकदा असे यशस्वी लोक आपल्या संघर्षाच्या ठिकाणी जाणे पसंत देखील करत नाहीत. परंतु दक्षिण कोरियात राहणाऱ्या एका अब्जाधीशाची कहाणी यापेक्षा अत्यंत वेगळी आहे.

ही कहाणी दक्षिण कोरियातील एका अब्जाधीशाची असून तो एका छोट्या गावातून संघर्ष करत आता धनाढ्या झाला आहे. या व्यक्तीने भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगाची हवा देखील खाल्ली आहे ही गोष्ट वेगळी. परंतु त्याने जे आता केले आहे, ते देशविदेशात चर्चेचा विषय ठरले आहे. इतका उदारपणा बहुधाच कुठलाच व्यक्ती स्वत:च्या गावासाठी दाखवत असेल.
दक्षिण कोरियातील प्रॉपर्टी डेव्हलपर कंपनी बूयॉन्गचे 82 वर्षीय अध्यक्ष ली जोंग क्यून सध्या सर्वत्र कौतुकाचे धनी ठरले आहेत. याचे कारण आहे त्याचा एक निर्णय. त्यांनी स्वत:चे गाव उनप्योंग रीसाठी कोट्यावधी रुपयांचे दान केले आहे. त्यांनी स्वत:च्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांना प्रत्येकी 57 लाख रुपये प्रदान केले आहेत. गावातील 280 कुटुंब आणि माजी विद्यार्थ्यांना त्यांनी एकूण 1596 कोटी रुपये दिले आहेत. स्वत:च्या वर्गमित्रांनाही त्यांनी ही रक्कम दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांना इतिहासाची पुस्तके तसेच टूलसेट त्यांनी वाटले आहेत. आभार व्यक्त करण्याच्या उद्देशाने गावातील लोकांना हे पैसे दिल्याचे त्यांचे सांगणे आहे.

1941 मध्ये ली जोंग क्यून यांचा याच गावात जन्म झाला होता. 1970 मध्ये त्यांनी रियल इस्टेट डेव्हलपर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांची एकूण संपत्ती सद्यघडीला 1.31 लाख कोटी रुपयांची आहे. क्यून हे दक्षिण कोरियाच्या धनाढ्या व्यक्तींपैकी एक आहेत. फसवणूक आणि करचोरीप्रकरणी क्यून यांना 2004 आणि 2018 मध्ये अटक झाली होती, परंतु यामुळे त्यांच्या उद्योगावर कुठलाच प्रभाव पडलेला नाही.









